मुंबई /

एअर इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी टाटा समूहाच्या पार पडलेल्या बोर्डाच्या बैठकीत चंद्रशेखरन यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे.

जवळपास 69 वर्षांनंतर तोट्यात चालणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया जानेवारी 2022 मध्ये पुन्हा टाटा समूहाच्या मालकीची झाली आहे. तेव्हापासून कंपनीसाठी कुशल नेतृत्वाचा शोध टाटा समूहाकडून सुरु होता.

तुर्की एअरलाईन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी याची या पदासाठी नियुक्ती केली होती, मात्र त्यांनी पदभार स्विकारण्यास नकार दिल्याने पुन्हा एकदा शोध सुरु झाला होता. अखेर, टाटा समुहाने ही जबाबदारी आता एन. चंद्रशेखरन यांच्या खांद्यावर सोपवली आहे. गेल्याच महिन्यात टाटा सन्सच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर त्यांच्यावर ही दुसरी मोठी जबाबदारी सोपविली आहे.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीमधून एमसीएचे शिक्षण पूर्ण करणारे चंद्रशेखरन 1987 मध्ये टाटा समूहात शामील झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली टीसीएस ही टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर यासारख्या कंपन्यांच्या बोर्डाचे ते अध्यक्ष आहेत. सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर एन. चंद्रशेखरन यांना टाटाच्या संचालक मंडळात घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page