वेंगुर्ला /-


महाराष्ट्र राज्य अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. यातील पंचसूत्रीचा कार्यक्रम याचा विचारही कुणी केला नसेल. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने कृषी व उद्योग विभागासाठी केलेली तरतूद ही निश्‍चितपणे राज्य पुढे जाण्यासाठी उपयोगी होईल.गेल्या कित्येक वर्षातील हा उत्कृष्ट अर्थसंकल्प आहे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा कृषीभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केली.यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेले २ अर्थसंकल्प हे कोव्हिडच्या आपत्तीत सादर केले.मात्र या अर्थसंकल्पात दादांची किमया दिसून आली. गेल्या २ वर्षापासून प्रामाणिक शेतीकर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचे चालले होते. मात्र या बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करण्यात आली हे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार येतील हे निश्‍चित झाले आहे.शेती व शेतीपूरक उद्योगांसाठी केलेली तरतूद विशेषतः महिला शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. शेतकरी आपल्या उत्पादनावर मूल्यआधारित प्रक्रिया करु शकतील. शेतकऱ्यांसाठी वाढविलेले अनुदान पाणी अडवा – पाणी जिरवा योजनेला हातभार लावेल. गेल्या २ वर्षात कोव्हिडमुळे तसेच नोटाबंदी, जीएसटी सारख्या चुकीच्या निर्णयामुळे लघुउद्योजक मेटाकुटीला आलेले आहेत. काही उद्योग बंदच झालेले आहेत.उद्योग विभागासाठी १ लाख ८९ हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याने लघुउद्योजकांसाठी हा बुस्टर डोस आहे. कोव्हिडच्या महामारीमुळे आरोग्य विभागाला अधिकच्या मदतीची नितांत गरज होती. अर्थमंत्र्यांनी त्याचाही सकारात्मक विचार आपल्या बजेटमध्ये केलेला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सुदृढ झाल्याशिवाय सामान्य नागरिकांना न्याय मिळणे शक्य नसते.भरीव तरतुदीमुळे सामान्य नागरिक निश्चितपणे खुश होईल.छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात किल्लेगड सुधारण्यासाठी तसेच त्यांनी बांधलेल्या विजयदुर्ग व इतर प्रमुख बंदरांसाठी केलेली भरीव आर्थिक तरतूद सर्व शिवप्रेमींना प्रेरणादायी आहे. एकंदरीत, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा विचार करता अंगणवाडी, रस्ते, किल्ले यासहित सर्वच प्रमुख विभागांना आर्थिक तरतूद झालेली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अडलेले पाणी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने भरघोस निधीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यास आवश्यक निधी मिळू शकेल.महाराष्ट्रातीलच एक कर्तुत्ववान मंत्री नितीन गडकरी हे केंद्रामध्ये आहेत. त्यामुळे निधीसाठी फार त्रासाचे होणार नाही. विरोधकांना अर्थसंकल्प चांगला आहे असे म्हणता येणार नाही. कारण गेली कित्येक वर्षे अधिवेशनाच्या आदल्या दिवशी चहापानावर बहिष्कार टाकला जातो, तसेच अर्थसंकल्पावर निदान ढोबळ टीका करावी लागते किंवा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर साहेब यांच्या प्रमाणेच हा भाजपचाच अर्थसंकल्प असे म्हणावे लागते. म्हणजे महाआघाडी बरोबरच भाजपला हा अर्थसंकल्प मान्य आहे, असेच समजावे लागेल.२०२२ -२३ चा अर्थसंकल्प हा परिपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा आहे, असे शेवटी एम.के. गावडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page