कुडाळ /-

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे येथील गोडया पाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्पात विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्ताने नुकताच शोभिवंत मत्स्यपालन व व्यवस्थापन या विषयावरील ५ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम संप्पन झाला. या कार्यक्रमात एकूण २३ प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार आणि कृषि विषयाचे अभ्यासक श्री. राजन चव्हाण उपस्थित होते. त्यांनी तसेच उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.पुढील चार दिवसांच्या तांत्रीक सत्रात विविध विषयावर प्रशिक्षणार्थीना व्याख्यान व प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या दिवशी प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक आणि मत्स्यसंशोधन व संवर्धन

प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत यांनी प्रशिक्षणार्थीना या व्यवसायाची सद्यस्थिती, भवितव्य, वाव आणि विविध उपपर्याय याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. मनोज घुघुसकर यानी माशांची ओळख व जीवशास्त्र याबाबत तर डॉ. राहुल सदावर्ते यांनी शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्पाचे शास्त्रीय दृष्टया बांधकाम, आवश्यक उपकरणे त्यांची उपलब्धता आणि त्यांचा वापर करण्याच्या पध्दती याबाबत मार्गदर्शन केले.दुस-या दिवशी शोभिवंत माशांना लागणारे जीवंत व कृत्रीम खाद्य व तयार करण्याच्या पध्दती याबाबतची माहिती व प्रात्यक्षिक डॉ. मनोज घुघुसकर यांनी घेतले. तर माशांना होणारे विविध रोग, आजार व त्यावरील उपचार पध्दती याबाबतचे मार्गदर्शन डॉ. गजानन घोडे यांनी केले. प्रकल्पात वापरण्यात येणा-या पाण्याचे व्यवस्थापन व तपासण्याच्या पध्दती याबाबतची माहिती व प्रात्यक्षिके डॉ. घुघुसकर यांनी घेतले.

तिस- या दिवशीच्या सत्रात रत्नागिरी मत्स्यमहाविद्यालयाचे डॉ. सुरेश नाईक व डॉ. शशिकांत मेश्राम यांनी शोभिवंत माशांच्या प्रजननाच्या विविध पध्दती व बीजनिर्मिती या विषयावर मार्गदर्शन केले. तर मत्स्यविभागाचे विकास अधिकारी श्री. विजय देवकर यांनी शोभिवंत मत्स्यपालनाकरिता शासनाच्या विविध योजना आणि पंतप्रधान मत्स्यसंपदा,योजनेबाबत प्रशिक्षणार्थींना माहिती दिली.शोभिवंत मत्स्यप्रकल्पाचा अहवाल कसा तयार करावा व प्रकल्पाचे अर्थशास्त्र याबाबतची सविस्तर माहिती रत्नागिरी मत्स्यमहाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. केतनकुमार चौधरी यांनी दिली.

चौथ्या दिवशीच्या सत्रात सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरीचे शास्त्रज्ञ प्रा. कल्पेश शिंदे व प्रा. सचिन साटम यांनी अनुक्रमे काचेचे मत्स्यालय बांधणी व सुशोभिकरण आणि शोभिवंत माशांची काढणी, पॅकींग व वाहतूक या विषयावरील माहिती प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षणार्थींना दिली.मत्स्यालयातील पाणवनस्पतींची ओळख, प्रकार व अभिवृध्दीच्या पध्दती याबाबतची माहिती डॉ. सावंत यांनी दिली तर वित्तीय संस्थांच्या कर्जविषयक योजनांची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. विनायक कु-हाडे यांनी दिली.

सत्राच्या पाचव्या दिवशी प्रशिक्षणार्थीना श्री. नारायण चव्हाण या कुडाळ येथील शोभिवंत मत्स्यपालन व्यावसायीकांचा प्रकल्प दाखविण्यात आला व श्री. संतोष सामंत, वेताळ बांबार्डे येथील शेतक-यानी या व्यवसायातील स्वतःच्या जडणघडणीची माहिती विषद केली.कार्यक्रमाच्या समारोपाला प्रमुख अतिथी सिंधुदूर्गचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. रविंद्र मालवणकर आणि यशस्वी कोळंबी संवर्धक श्री. राजेश पोपकर यानी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले व प्रमाणपत्राचे वाटप केले.

कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन करण्याकरिता मत्स्यप्रकल्पाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक श्री. विनय सहस्रबुध्दे व प्रकल्पाचे सहकारी कु. अंकिता फोंडेकर, कु. सुषमा पालव, श्री. कारासीन मॅडीस, श्री. सत्यवान मालोंडकर, श्री. सोमा पालव, श्रीम. अणसुरकर यांनी विषेश मेहनत घेतली.या प्रशिक्षणाकरिता मुंबई, रत्नागिरी, सांगली, सिंधुदूर्ग आणि गोवा येथून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page