वेंगुर्ला /-


संपूर्ण कोकण हे नारळ शेतीसाठी पूरक आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंदाजे १८ ते १९ हजार हेक्टर क्षेत्रावर नारळ लागवड झालेली आहे.अजूनही २० ते २५ हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली होऊ शकते. बदलत्या हवामानानुसार आंबा – काजू ही पिके शाश्वत राहिली नाहीत. मात्र नारळपीक आज तरी शाश्वत आहे. शेतकऱ्यांनी नारळशेती कमर्शिअलरित्या करण्याची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन कृषीभूषण तथा प्रगतशील शेतकरी एम.के.गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले.नारळ विकास बोर्ड राज्य केंद्र ठाणे आणि महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला काथ्या संस्था वेंगुर्ले येथे सहा दिवशीय नारळ मित्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कृषिभूषण तथा प्रगतशील शेतकरी एम.के. गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, नारळ उद्योजक समिर खानोलकर, नारळ मित्र प्रशिक्षक रुपेश तांबडे प्रथमेश गवंडे आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना एम.के.गावडे म्हणाले की,नारळाच्या जाती, व्यवस्थापन, रोगनियंत्रण याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले पाहिजे.केरळ, तामिळनाडू सारख्या राज्यात डोंगरावर नारळ पीक घेतले जाते व वर्षाकाठी ८ ते ९ वेळा नारळ काढणी होते. तसेच नारळ बागेमध्ये अनेक आंतरपिके चांगल्या प्रमाणात होऊ शकतात. सुपारी, केळी, अननस, मसाल्याची पिके घेतल्यास सुरुवातीच्या काळातील होणारा खर्च बऱ्यापैकी वसूल होतो. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी नारळ लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. नारळाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात आढळणारा युरोफाईड माईट (कोळी रोग) मोठ्या प्रमाणात दिसतो, मात्र कीटकनाशकांचा व्यवस्थित वापर व फर्टीलायझर मध्ये निमपेंडीचा उपयोग केल्यास निघून जातो. जंगली प्राण्यांचाही उपद्रव केळी, नारळ बागांनाही होत असतो. वास्तविक फॉरेस्ट डिपार्टमेंट यासाठी जबाबदार आहे. जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करणे किंवा त्यांच्या अधिवासात त्यांना सोडणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत.शेतकरी एकत्र झाल्यास पीकविमा, प्राणी बंदोबस्त व केंद्र सरकारच्या अनेक योजना जिल्ह्यामध्ये राबविता येतील,असेही एम.के. गावडे म्हणाले.नारळपीक हे फक्त नदीकिनारीच होते, किंवा शहाळी काढली तर झाड घाबरतं किंवा नारळ परिपक्व होऊन पडेपर्यंत काढता नये, हे सर्व गैरसमज असून या जुन्या संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत असेही गावडे म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रज्ञा परब म्हणाल्या की, तरुण-तरुणींनी नारळ शेती, नारळ प्रक्रिया या उद्योगाकडे वळले पाहिजे.आमची संस्था गेली १०-१२ वर्षे नारळमित्र म्हणजे नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रशिक्षण कोकोनट बोर्ड भारत सरकारच्या माध्यमातून देत आहे.संस्थेमार्फत आम्ही आज पर्यंत ४०० पेक्षा जास्त तरुण-तरुणींना नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रशिक्षण दिले आहे. केंद्र सरकारच्या नारळ विकास बोर्डाचा जास्तीत जास्त निधी कोकणात आला पाहिजे. सर्व निधी हा दक्षिण भारतात खर्च होतो व आमचे प्रयत्नही कमी पडतात.यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास नारळ शेती फायद्याची होऊ शकेल.नारळ बागांमध्ये हिरवा चारा मिळतो, या हिरव्या चाऱ्याचा उपयोग करून दुग्ध व्यवसाय होऊ शकतो व उद्योग केल्यास सोयीचे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page