देवगड /

देवगड एसटी स्टँडपासून जवळ असलेले महेश घारे ज्वेलर्स हे दुकान फोडण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कडक सुरक्षाव्यवस्था ठेवूनही चोरट्यांनी या दुकानाकडे पुन्हा लक्ष केंद्रीत केले असून क्रिकेट सामने पाहून येणाऱ्या आनंदवाडी येथिल एका ग्रामस्थाच्या सजगतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यांची चाहुल लागताच चोरट्यांनी पळ काढला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड एसटी स्टँडनजीक महेश श्रीधर घारे यांच्या मालकीचे महेश घारे ज्वेलर्स हे दुकान असून रविवारी पहाटे ३ वा. सुमारास कटरने दुकानाचे कुलूप कोणीतरी तोडत असल्याचे मिठबांव येथून क्रिकेट मॅच पाहून येणाऱ्या आनंदवाडी येथील एका नागरिकाच्या दृष्टिस पडले. त्यांनी तात्काळ घारे यांच्याशी संपर्क साधून बोलावून घेतले. मात्र हे लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला.

महेश घारे हे तात्काळ दुकानाकडे आले. त्यावेळी कुलूप तोडण्यासाठी वापरण्यात येणा-या कटरला लागण्यासाठी आणलेली वायर दुकानासमोर पडलेली मिळाली. दुकानाची दोन्ही कुलूपे तोडण्यात आली होती. घारे यांचे सव्वा वर्षापुर्वी अशाचप्रकारे चोरट्यांनी दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे घारे यांनी दुकान पुन्हा नव्याने बांधून सुसज्ज बनविले असून यामध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा बसविली आहे. सायरन, सीसीटीव्ह कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

महेश घारे यांनी तात्काळ देवगड पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सीसीटीव्ह फुटेज तपासण्यात आले. यावेळी चोरी करण्याचा प्रयत्न करताना व कुलूप कटरने तोडताना चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधल्याचे दिसत असून अस्पष्ट चित्र दिसत आहे. चोरट्यांनी कटर चालविण्यासाठी लागणारी वायर शेजारी असलेल्या कॉम्प्लेक्समधील आणली. ती वायर टाकून त्यांनी पळ काढला. श्वानपथक बोलाविण्यात आले. त्यांनी माग घेतला मात्र तेही घुटमळले. घारे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास पो. हे. कॉ. राजन जाधव, पो. ना. आशिष कदम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page