मालवण /-

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक असताना पालिकेचे मुख्याधिकारी शहरात मुजोरपणे वागत असून फक्त दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात धन्यता मानत आहेत. आरोग्यासह अन्य महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नये. अन्यथा आम्हाला त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल असा इशारा पालिकेचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी पत्रकातून दिला आहे.

मुख्याधिकारी स्वत:चे शहरात राज्य असल्यासारखे वागत आहेत. सध्या कोविडचा शहरात प्रादुर्भाव वाढत असताना मुख्याधिकारी हे सिंगम स्टाईलप्रमाणे फक्त दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात धन्यता मानत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर त्यावर नियंत्रणासाठी अत्यावश्यक अशा तपासण्या अगर आरोग्य सुविधा नागरिकांना देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. शहरात मोकाट कुत्रे, गुरांचा त्रास जनतेला होत असताना त्यादृष्टीनेही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शहरातील रूग्ण संख्या वाढत असताना पालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सौजन्य मुख्याधिकाऱ्यांनी दाखविले नाही आणि त्याबाबत नियोजनही केलेले नाही. मुख्याधिकारी हे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याप्रमाणे शहरात काम करत असल्याचे दाखवत आहेत. मुंढेचा आदर्श जरूर घ्या. पण सगळ्याच बाबतीत घ्या. यासाठी छोट्या छोट्या दंडात्मक कारवाई अगर दारुड्यांना पकडण्यासाठी फ्रिस्टाईल पळापळ असे प्रकार करून, मटकावाल्यांवर धाड घालण्यात मूळ मुद्द्याला बगल देऊन जनतेची दिशाभूल करू नये.
शहरवासियांना सुविधा देण्यास कोणताही अॅक्शन प्लॅन त्यांनी आखलेला नसून ते शहरात केवळ स्टंटबाजी करत आहेत.

शहरवासियांना अभिप्रेत काम करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना संधी असतानाही ते फक्त आदेश बजावणीत गुंतलेले दिसून येत आहेत. कंत्राटी कामगारांच्या जिवीताशी खेळण्याचा प्रकारही पालिकेत होत आहे. कंत्राटी कामगारांचे विमा उतरविले नसतानाही त्यांना कोरोना बाधित रूग्ण सापडून आलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी पाठविले जात आहे. त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे पीपीई कीट, आवश्यक ती काळजी न घेता, त्यांना थेट बाधित क्षेत्रात पाठविले जात आहे.भविष्यात या कामगारांच्या जीवीतास, कुटुंबीयांना धोका पोचल्यास याला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार राहतील असे वराडकर यांनी म्हटले आहे.

कोरानाची साथ सुरू होवून सुमारे सहा महिन्यांचा कालावधी उलटला असून अजून कालावधी लागेल हे सांगणे मुश्कील असताना शहरासाठी भविष्याचे नियोजन कुठे आहे? नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यात लुटुपुटुचा खेळ सुरू असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून मालवणच्या जनतेची केवळ दिशाभूल करण्यात येत आहे. शहरात सातत्याने जंतुनाशक फवारणी करणे, शहरात पन्नास बेडचे पालिकेचे स्वत:चे कोविड केअर सेंटर, नागरीकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी औषध वाटप यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास मुख्याधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता आमच्या संयमाचा मुख्याधिकाऱ्यांनी अंत पाहू नये. अन्यथा त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल असा इशाराही श्री. वराडकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page