दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत लवकरच मनसंतोष गडावर चढाई करण्यासाठी ट्रेकिंग कार्यक्रमांचे आयोजन.

कुडाळ /-

दुर्गप्रेमी मनोहर मनसंतोष गडावर भ्रमंती करायला जातात परंतु त्यांना मनोहर गडावरूनच परतावे लागते कारण, मनसंतोष गडावर चढताना सुरुवातीच्या दोन टप्प्यांवरील पायऱ्या सुस्थितीत आहेत. त्यापुढील टप्प्यांवरील तीन चार पायऱ्या वगळता सर्व पायऱ्या कोसळलेल्या आहेत. सुस्थितीत असलेल्या पायऱ्यांवर दगड माती साचलेली असल्याने या गडावर चढण्यासाठी आपल्याला रोप लावूनच चढणे आवश्यक आहे.

प्रशिक्षित व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच मनसंतोष गडावरील चढाई करणे सुरक्षित आहे. कारण डाव्याबाजूस खोल दरी आहे. एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते. या अडचणींमुळे तसेच काही दुर्ग प्रेमींना या गडाबाबत माहिती नसल्याने दुर्गप्रेमी मनोहर गडावर भ्रमंती करून मागे फिरतात. मनसंतोष गडावर मनोहर गडावर येणाऱ्या दुर्गप्रेमींपैकी अवघे एक ते दोन टक्के च मनसंतोष गडाची चढाई करतात.

दुर्गप्रेमींची ही अडचण दूर करण्यासाठी आज रविवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग टीम प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मनसंतोष गडावर जाणाऱ्या मार्गावरील चढाई सोपी करण्यासाठी पेग व बोल्टिंगच्या आवश्यक जागांची पाहणी करण्यात आली. आवश्यक साहित्यांच्या साहाय्याने सर्व टीमने मनसंतोष गडावर यशस्वी चढाई केली. यावेळी चढाई करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

आता लवकरच सर्व पूर्वतयारी करून मनसंतोष गडावर जाण्याची इच्छा असणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी ट्रेकिंग कार्यक्रमांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन केले जाणार आहे त्यामुळे दुर्गप्रेमींचे मनसंतोष गडावर जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या मोहिमेला दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, ट्रेकिंग मार्गदर्शक प्रसाद सावंत, मनोहर मनसंतोष गड संवर्धन प्रमुख रोहन राऊळ, नितेश घावरे, तेजस भरडे, किशोर परब सहभागी झालेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page