कुडाळ /-

कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी शिबिरात दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांचे झालेली परवड ही जिल्हा सामान्य रुग्णालय व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच झालेली असून त्याला जिल्ह्यातील सत्ताधारी पक्ष देखील तितकेच जबाबदार आहेत. जिल्ह्यातील अपंग बांधवांची अशा पद्धतीने थट्टा करणे हे दुर्दैवी असून जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी याची जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी अशी लोकभावना आहे. मुळात मागील जवळपास सव्वा वर्षापासून जिल्हा रुग्णालयाचा कारभार हा प्रभारी शल्यचिकित्सकांद्वारे हाताळावा लागणे ही नामुष्की जिल्ह्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळेच जिल्ह्यावर आली आहे. आजपर्यंत आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत सत्ताधारी पक्षाची अनास्था ही वेळोवेळी जिल्हा वासियांनी अनुभवली आहे. मुळातच जिल्हा आरोग्य यंत्रणेत पुरेसे कर्मचारी व तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नाहीत, कुडाळ महिला व बाल रुग्णालय बांधणी करून दहा वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही, कोरोना सारख्या आपत्ती कार्यकाळात देखील सव्वा वर्ष जिल्ह्याला तज्ञ शल्यचिकित्सक डॉक्टर उपलब्ध होऊ शकला नाही, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात एक हजारांहून अधिक लोक कोरोना बळी ठरले या सर्व गोष्टी सत्तेतील पक्षांचे अपयश दाखवतात. आजच्या घडीस जिल्ह्यात मेडिकल कॉलेजच्या बाबतीत चालू असलेला खेळखंडोबा व त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसुविधांवर वर झालेला परिणाम पाहता आमदार, खासदार व पालकमंत्री उघड्या डोळ्यांनी फक्त मजा घेत आहेत का, असा सवाल उपस्थित होतो. आजमितीस जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण रुग्णालय नेमके कुठे आहे, त्याचा पत्ता काय आहे, ते कोणाच्या ताब्यात आहे हे जिल्हा प्रशासनाने एकदा जाहीर करण्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग जिल्हावासीयांना मेडिकल कॉलेज व भव्य रुग्णालय असे स्वप्न दाखवताना जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची अस्तित्वातील आरोग्य सुविधा हळूहळू ओस पडत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असून त्याला नियोजनशून्य कारभारच कारणीभूत आहे. “एक ना धड अन भाराभर चिंध्या” या परिस्थितीला पूर्णपणे सत्ताधारी जबाबदार असून शिवसेना प्रणित सरपंच संघटनेने पुढाकार घेऊन आपल्याच नेत्यांना याबाबत जाब विचारल्यास जनतेची आरोग्याच्या बाबतीतली गैरसोय कदाचित दूर होऊ शकेल, अशी टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page