वेंगुर्ला नगरपरिषद मार्केट व्‍यवस्‍थापन व शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी २ सप्टेंबर २०२० रोजी नगरपरिषद कार्यालयात शहरातील व्‍यापारी, नगरसेवक आणि नागरीकांसमवेत सभा संपन्न झाली.

सदरच्‍या सभेसाठी वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्‍यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्‍यक्षा अस्मिता राऊळ,गटनेते सुहास गवंडळकर,प्रकाशडिचोलकर,नगरसेवक विधाता सावंत, तुषार सापळे,धर्मराज कांबळी, पुनम जाधव व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर व व्‍यापारी उपस्थित होते.सदरच्‍या सभेमध्‍ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी करण्‍यात येणा-या उपाय योजनांवर विस्‍तृत चर्चा करण्‍यात आली.तसेच कोरोना कालावधीत शहरातील विकास कामांवर होणा-या विलंबावर सुध्‍दा साधक बाधक चर्चा करण्‍यात आली.या बैठकीमध्‍ये व्‍यापा-यांनी दररोज भाजी मार्केट उचलण्‍यात येवू नये, मच्छिमार्केट पहिल्‍याच ठिकाणी बसविण्‍यात यावे, शहरातील इतर भागात बसणा-या व्‍यापा-यांना सर्वाना एकाच ठिकाणी विक्रीसाठी बसविण्‍यात यावे,मार्केट वेळोवेळी सॅनिटाइज करण्‍यात यावे, फॉगिंग मशिनचा वापर न करता स्‍प्रे पंपाचा वापर करुन फवारणी करावी त्‍याचबरोबर शहरातील रखडलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करणेत यावीत अशा सुचना नगरसेवक, नागरिक व व्‍यापा-यांकडून मांडण्‍यात आल्‍या,यावर नगराध्‍यक्ष दिलीप गिरप यांनी प्रशासन प्रमुख म्‍हणून मुख्‍याधिकारी तसेच आपल्‍या सर्व सहकारी नगरसेवकांशी या सर्व मुद्यांवर चर्चा करुन प्रशासनाला पुढीलप्रमाणे सुचना केल्‍या.यामध्‍ये दररोज सायंकाळी ७ वाजेपर्यंत मार्केट सुरु ठेवण्‍यात यावे. तदनंतर प्रशासनाने मार्केट उचलून पाण्‍याने धुवून दररोज साफसफाई करणेत यावी. किमान आठवडयातून दोन ते तीन वेळा मार्केट सॅनिटाइज करण्‍यात यावे. शहरातील इतर भागात बसणारे भाजी विक्रेत्‍यांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने मार्केटमध्‍ये बसविणे संयुक्तिक होणार नाही.

सध्‍या मच्छिमार्केटचे बांधकाम सुरु असून ते पूर्ण होईपर्यंत म्‍हणजेच पुढील दोन महिने मच्छिमार्केट मुळ जागी बसविता येणार नाही. त्‍याचबरोबर व्‍यापारी संकुलाचे बांधकाम सुरु असल्‍याने अडचणी निर्माण होवू शकतात. त्‍यामुळे सद्यस्थितीत मच्छि मार्केट सध्‍या चालू असलेल्‍या ठिकाणी म्‍हणजे मानसी गार्डनचे समोर चालू ठेवण्‍यात येणार आहे. मच्छिमार्केटचे काम आता अनलॉक ४ मधील शासनाच्‍या निर्देशानुसार जिल्‍हयाच्‍या सर्व सिमा खुल्‍या झाल्‍यामुळे मजूर कामगार यांची उपलब्‍धता होणे आता सुलभ होणारे आहे. त्‍यामुळे येत्‍या दोन ते तीन महिन्‍यात मच्छिमार्केटचे काम युध्‍दपातळीवर पूर्ण करुन लोकार्पण करण्‍यात यावे.त्‍या संदर्भात सुचना प्रशासनाने संबधित ठेकेदाराला द्याव्‍यात,असे आदेश नगराध्‍यक्षांनी मुख्‍याधिकारी यांना केलेले आहेत.या सर्व अध्‍यक्षांच्‍या सुचनांची तातडीने अंमलबजावणी प्रशासनाने करावी,असे सर्वानुमते ठरविण्‍यात आले.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी शासनाच्‍या कोरोना विषाणू संदर्भातील नियमावलींची माहिती दिली.त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने नवीन नियमावलीनुसार एखाद्या नागरीकांची कोरोना टेस्‍ट पॉझिटिव्‍ह आली असेल, परंतु त्‍याला कोणतीही लक्षणे दिसून येत नसतील तर अशा व्यक्तीला होम आयसोलेशन करता येते. फक्‍त अशा पेशंटच्‍या घरी वेगळी खोली आणि संडास बाथरुमची व्‍यवस्‍था असणे बंधनकारक राहील.

तसेच २४ तासात बाहेर गावातून जाउन येणा-या व्‍यक्‍तीला क्‍वारंटाईन केले जाणार नाही. परंतु इतर जिल्‍हयातून व राज्‍यातून वेंगुर्लेत वास्‍तव्‍यास येणा-या व्‍यक्‍तीला १४ दिवस क्‍वारंटाईन रहावे लागेल. घराबाहेर पडताना प्रत्‍येक व्‍यक्‍तीने मास्‍क वापरणे बंधनकारक आहे. त्‍याच बरोबर सामाजिक अंतर राखून आपले व्‍यवहार करावे.आरोग्‍य विभाग, नगरपरिषद प्रशासन, व्‍यापारी व नागरीक यांची संयुक्‍त बैठक घेतल्‍यामुळे या सर्वामध्‍ये समन्‍वय साधणे शक्‍य होईल व गैरसमज दूर होतील आणि कोरोना विषाणूंचा फैलाव कमी होण्‍यास मदत होईल. सर्वानी सहकार्याच्‍या भावनेने काम करुन वेंगुर्ला शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे हित जोपासण्यासाठी मदत करावी तसेच कोरोना विषाणूंच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे शहरातील विकास कामांना होणारा विलंब या सर्वावर मात करुन शहराचा सर्वांगीण विकास करण्‍यास मदत करावी असे आवाहन नगराध्‍यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page