कुडाळ /-

येथील नर्सिंग महाविद्यालयातील बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाचा दुसऱ्या तुकडीचा विद्यार्थी कु. सिद्धेश रामचंद्र ओटवणेकर हा बाहरीन (बेहरन) या आखाती देशात नर्सिंग सेवा बजावत आहे. त्यासोबतच बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातून परदेशात सेवा स्वीकारणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. २०२१च्या मे महिन्यात कोरोना संक्रमणाने उच्चांक गाठलेला असताना त्याला परदेशात सेवेत रुजू होण्याची संधी मिळाली आणि आपल्या पेशा ला साजेसा धाडसी निर्णय घेऊन आज गेले आठ महिने तो परदेशात रुग्णांची सेवा करत आहे. सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन आणि कौतुक होत असताना बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयासाठी देखील ही फार अभिमानाची बाब आहे. सदर महाविद्यालयात बेसिक बीएससी नर्सिंग पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून त्याने ऑक्टोबर २०१४ ते मे २०२१ येवढ्या ७ वर्षे कालावधीत लीलावती हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी आपली सेवा बजावली आणि त्या अनुभवाच्या बळावर आता तो परदेशात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावचा रहिवासी असलेल्या सिद्धेशने आपले शालेय शिक्षण कुडाळ हायस्कूल येथून तर माध्यमिक शिक्षण हे साळगाव येथील कनिष्ठ महाविद्याल येथे पूर्ण केले आहे. जनसामान्यांसाठी अतिशय अवघड वाटणारी अशी ही संधी सिद्धेशने साध्य करणं ही कौतुकास्पद बाब आहे त्याचा हा प्रवास महाविद्यालयात शिकत असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थीदशेत महाविद्यालयामधून मिळणाऱ्या रुग्णसेवेसाठी लागणार्‍या वैद्यकीय ज्ञानासोबतच इतर जीवन कौशल्यांचे मिळणारे शिक्षण आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक मेहनत यातूनच हे यश प्राप्त झाले आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या आणि इतर शिक्षक वर्गाकडून सिद्धेशच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page