सावंतवाडी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्यातील खेळाडू विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढावा याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा आईनबॉल असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र आईनबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनानुसार व प्रोत्साहनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा आईनबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष तथा क्रीडा, सहकार व सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे उमाकांत वारंग यांची निवड करण्यात आली आहे. तसेच युवा उद्योजक तथा युवा नेते विशाल परब यांची सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे निवडीचे पत्र महाराष्ट्र आईनबॉल असोसिएशनचे सचिव चंद्रकांत भदाणे यांनी उमाकांत वारंग व विशाल परब यांना पाठविले आहे. उमाकांत वारंग हे सावंतवाडीचे सलग पाच वेळा नगरसेवक, एकदा स्वीकृत नगरसेवक तर एकदा उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. तसेच स्वर्गीय पंतप्रधान व्ही. पी. सिंग हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना उमाकांत वारंग यांनी त्यांचे पायलट म्हणून गाडी हाकली होती, तसेच उमाकांत वारंग हे क्रीडा सभापती असताना त्यांनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांना सावंतवाडीत पाचारण केले होते.

भाजपाचे युवा नेते व उद्योजक विशाल परब यांनी अल्पावधीत अनेक विधायक उपक्रम राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रीडा व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. म्हणून दोन्ही व्यक्तींचे कार्य पाहून महाराष्ट्र आईनबॉल असोसिएशनने उमाकांत वारंग यांना अध्यक्षपद तर विशाल परब यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा आईनबॉल असोसिएशनचे सचिवपद बहाल केले आहे. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page