कणकवली /-

स्वतःच्या स्वार्थासाठी राणेंना जिल्हा बँकेचा कारभार हवा आहे. नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा माझ्यासह तेरा कार्यकर्त्यांच्या नावावर त्यांनी बोलेरो गाडी घेतली होती. त्या गाड्यांच कर्ज आम्ही स्वतः फेडलं आहे. त्या गाड्या आजही त्यांच्या ताब्यात आहेत. ७ गाड्यांचं प्रत्येकी १८ लाख कर्ज अजूनही थकीत आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते अण्णा केसरकर यांचेही १७ लाख थकित आहेत. त्यांचेही पैसे अजून भरले गेले नाहीत. या बोलेरो गाड्यांचे १ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत आणि हे कर्ज बुडविण्यासाठीच त्यांना ही जिल्हा बँक ताब्यात हवी आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राणेंना बँक नकोय, असा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे जिल्हा बँक निवडणुक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे. तसेच कोणीही कितीही धनशक्तीने दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला तरी निर्भीडपणे मतदान करायचा निर्णय जिल्हा बँकेच्या ९८१ मतदारांनी केला आहे. त्यामुळे ही जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीच जिंकेल. असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे.

कणकवली येथील शिवसेना शाखेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही जिल्हा बँक निवडणूक निर्भीडपणे आणि शांततेत पार पडेल. ही जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या घामाचं आणि कष्टाचं मोल सहकारी संस्थांना आहे. त्याच प्रतिबिंब उद्याच्या निवडणुकीत दिसेल. ज्या मतदारांना गायब केलं गेलंय ते उद्या त्या मतदारकडून समजेल. कर्ज थकीत असलेल्यांना बँकेत शिरकाव करायला दिला जाणार नाही. गेल्या साडे सहा वर्षांत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामामुळे बँकेच्या ठेवी तसेच कर्जात वाढ झाली. सध्याच्या स्पर्धात्मक युगात सहकारी बँकेच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे जिल्हा बँकेने आपल्या ग्राहकांना सुविधा दिल्या आहेत. जिल्हा बँकेच्या अंतर्गत विद्यार्थी बँक ही संकल्पना सुरू केली जाणार आहे. त्याअंतर्गत कॉलेज शाळांमध्येच सहकाराचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातील. बँकेच्या ठेवी वाढण्यासाठी जिल्ह्यात फळप्रक्रिया, दुग्ध, मत्स्य, शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात येईल. गावागावातील छोट्या गिरणीधारकांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम दिलं जाईल. भात भरडाई करणाऱ्या गिरणीधारकांना गावात काम मिळेल. २००७ मध्ये जिल्ह्यात ऊसाचं उत्पादन सात हजार टन होते. ते आता एक लाख दहा हजार टनांपर्यंत गेलं आहे. यापूर्वी ऊस कारखान्याची फक्त चर्चा झाली. राजकीय विरोधात तो होऊच शकला नाही. त्यामुळे येत्या पाच वर्षांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात साखर आणि इथेनॉल निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचा साखर कारखान्याला कधी विरोध नव्हता. आता राणे जरी कारखाना उभारत असतील तर त्याला जिल्हा बँकेचे संचालक मंडळ सहकार्य करेल. जिल्ह्यातील छोटी छोटी धरणे पूर्ण झाली तर साडे तीन लाख ते चार लाख टन उसाचं उत्पादन झालं तर सुमारे २००-२५० कोटींची उलाढाल जिल्ह्यात वाढेल. जिल्ह्या व्यवसाय वाढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक एकतर्फी होईल आणि १८ जागांवरही शेतकऱ्यांचाच झेंडा फडकेल आणि त्यांच्याच हातात रिमोट राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page