कणकवली /-

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांना कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशी करता आर.पी.सी कलम १६० अन्वये नोटीस काढत पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शनिवारी १८ डिसेंबर रोजी परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते.

संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंतच, असा सतीश सावंत यांचा आरोप होता. जिल्हा बँक निवडणुकीतील माझे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या भाडोत्री गुंडांनी केल्याचे सांगत या हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा बँक निवडणूक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला.

गुन्हयाचे तपासकामी कणकवली पोलीस ठाणे येथे हजर आ. नितेश राणे यांना कणकवली पोलीस स्टेशन, जिल्हा सिंधुदुर्ग गुन्हा रजि, क्रमांक ३८७ / २०२१ IPC कलम ३०७, ३४ आपणास याव्दारे कळविण्यात येते की, फिर्यादी संतोष मनोहर परब ( वय ४४ वर्षे रा. साक्षी अपार्टमेंट कनकनगर ता. कणकवली) हे त्यांचे मोटार सायकल (एम. एच. ०७. ओ. एफ. ३०९८) हिरो शाईन मोटार सायकल वरुन कणकवली नरडवेनाका ते कनेडी कडे जात असताना त्यांचे मोटरसायकलच्या पाठीमागुन येणारे नंबरप्लेट नसलेल्या इनोव्हा कारने प्रथम धडक दिली, असता फिर्यादी हे खाली पडले असता इनोव्हा कार मधील एक अज्ञात व्यक्तीने खाली उतरुन ” तु सतीश सावंत यांचे काम करतोस का बघतो तुला ” असे म्हणुन त्याचेकडील चाकुने फिर्यादी यांचे छातीच्या बाजुस वार करुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच सदर इसम जाताना ” गोटया सावंत व नितेश राणे ” यांना कळवायला पाहीजे असे म्हणुन तो इनोव्हा कार मध्ये बसुन पळुन गेला म्हणुन फिर्यादि यांनी दिले. फिर्यादिवरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास • आम्ही करीत आहोत. तरी सदर गुन्हयाचे अनुषंगाने आपल्याकडे तपास करावयाचा असल्याने आपण कणकवली पोलीस ठाणे येथे आमच्या समक्ष हजर रहावे, अशी नोटीस पोलीस निरीक्षक कणकवली सचिन हुंदळेकर यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page