सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यातील बांदा, दोडामार्ग, माडखोल आदी भागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचं, गावांचं दरवर्षी होणारं नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच लक्ष वेधल होत. दरम्यान,
कोकणातील नदीकाठच्या शहरातील पूरस्थितीसंबंधात उपाययोजना करण्याबाबत उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचं काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यावेळी दिले. कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला असून अनेक ठिकाणी गाळाची बेटे तयार झाली आहेत. त्यामुळे नद्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. कोकणात मूळात पावसाचं प्रमाण जास्त असतं. गेल्या काही वर्षात कोकणाला सातत्यानं अतिवृष्टीचा फटका बसत आहे. कोकणातील नद्यांच्या काठी पुरस्थिती निर्माण होऊन शहरं, गावातील नागरी वस्त्यांचं, नदीकाठच्या शेतजमिनींचं नुकसान होत आहे. वारंवार होणारे हे नुकसान टाळण्यासाठी नद्यांमधील गाळ, बेटे काढण्याचं काम युद्ध पातळीवर करावं त्यासाठी आवश्यक असणारा निधी जलसंपदा विभागानं तातडीनं वितरीत करावा. पुराचा धोका टाळण्यासाठी वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. हे काम वेगानं आणि सुनियोजित पध्दतीनं होण्यासाठी एकाचवेळी अनेक ठिकाणी कामांना सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे काम वेगानं पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागात आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची खरेदी करण्यात येणार आहे. नदीतील गाळ व त्यामुळे तयार झालेली बेटे काढल्यानंतर नदीची वहन क्षमता वाढणार असून नदीकाठच्या गावांचा, शहरांचा पुराचा धोका कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page