वेंगुर्ला /-

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने सलग आठव्या वर्षी ‘अश्वमेध’ मोहोत्सवातंर्गत खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धा ‘खुल्या’ व ‘शालेय’ अशा दोन गटात आयोजित केलेली आहे. सद्यस्थितीत नात्यात गरज आणि व्यवहारिकता मूळ धरू लागली आहे. ‘प्रायव्हसी’च्या नावाखाली आपलेपणा, नात्यातील जिव्हाळा विरळ होत आहे. एकत्र कुटूंब विभक्त झाली, विभक्त कुटुंब मी आणि माझा संसार या  मर्यादेत विसावत आहेत. यामुळे संकुचित वृत्तीने नात्याकडे पाहताना आई-वडील की  वृद्धांची जबाबदारी असा व्यवहारिक व भावनाशून्य दृष्टिकोन तयार होत आहे. अशा संवेदनशील विषयावर मत मांडण्यासाठी ‘हरवले कुटुंब….. सापडले वृद्धाश्रम’ हा खुल्या गटासाठी  विषय आहे. माणूस अक्षरशः निसर्गाला ओरबडत आहे.२१ व्या शतकात आज दुष्काळ, प्रदूषण, इंधन तुटवडा,वादळ अशा नवनव्या नैसर्गिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.परंतु भविष्यात  अशा समस्यांपासून प्रतिबंध हवा असेल तर नैसर्गिक साधनसामुग्री आणि अनावश्यक घटकांचा वापर यावर मर्यादा असणे आवश्यकता आहे.कोव्हिड काळात तर माणसाला जीवन जगताना काटकसरीने कसं जगावं याचा वस्तुपाठच मिळाला आहे.नैसर्गिक आणि भौतिक साधने यांचा अगदी लहानपणापासून काटकसरीने वापर करायलाच हवा ही मानसिकता अगदी लहान वयातच मुलांच्या मनांवर बिंबवणे गरजेचे बनले आहे.याच विषयावर विचारमंथन करण्यासाठी  ‘काटकसर : नव्या युगाचा वसा’ हा इयत्ता १०वी पर्यंत शालेय गटासाठी निबंध स्पर्धेचा विषय आहे.स्पर्धेतील खुल्या गटास प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रक्कम १००० रुपये, ७०० रुपये;  ५०० रुपये आणि शालेय गटास  ७०० रुपये, ५०० रुपये, ३०० रुपये व प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात  येईल.सहभागी स्पर्धकांनी निबंध कागदाच्या एका बाजूला स्वहस्ताक्षरात (खुला गट:किमान १०००शब्द, शालेय गट: किमान ५०० शब्द) लिहून
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस
द्वारा- प्रा.सचिन वासुदेव परुळकर,मु.पो.तुळस, खरीवाडी, पिन ४१६५१५
या पत्त्यावर किंवा स्वहस्ताक्षरात लेखन केलेला निबंध स्कॅन PDF करून vpstulas@gmail.com या मेलवर  दि.८ जानेवारी २०२२ पर्यंत पाठवावा.स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी सचिव प्रा.सचिन  परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page