वेंगुर्ला /-


श्री देव घोडेमुख शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा संस्था पेंडुर ही संस्था गावच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे. अशा संस्थेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मनाला समाधान वाटत. वर्षानुवर्षे या संस्थेमार्फत असेच लोकांना हवी असलेली सामाजिक, शैक्षणिक कामे होत राहावी व या भागाची प्रगती व्हावी यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी पेंडुर येथे केले. पेंडूर येथे श्री देव घोडेमुख शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कला व क्रीडा संस्था, पेंडुर या संस्थेतर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आजपर्यंत अनेक संस्था पहिल्या. मात्र अतिशय दुर्गम भागात ही संस्था चालवत असताना असे कार्य पाहून आनंद झाला असेही राणे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रमोद जठार, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, पद्मश्री परशुराम गंगावणे, जि. प. सदस्य दादा कुबल,जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, तुळस सरपंच शंकर घारे, नेवगी, पेंडुर उपसरपंच प्रमोद शिरोडकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, मळेवाड सरपंच हेमंत मराठे, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, आनंद माळकर, ताता मेस्त्री, अनिल परब, तुळस माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, विनय गोरे, आपा गावडे यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष, पेंडूर माजी सरपंच संतोष गावडे यांनी प्रास्ताविकात संस्थेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, या संस्थेमार्फत नेहमीच गावातील गरीब व गरजूंना मदत केली जाते. गेली १० वर्षे कार्यरत ही संस्था शून्यातून उभी राहिली असून पेंडूर ग्रामविकास मंडळ मुंबई व पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गावच्या हितासाठी काम करत आहे.
यावेळी सर्वप्रथम या कार्यक्रमात कै. जनरल बिपीन रावत, संस्थचे संचालक कै. पपु सावंत व गावातील मृत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर भारताचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे व पेंडूर गावचे सुपुत्र सिताराम विष्णू गावडे यांची मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गावातील १० वी, १२ वी, पदवीधर गुणवंत विद्यार्थी, इतर विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी तसेच गावातील वृद्ध दांपत्य गोविंद व भारती वैद्य, गंगाराम व प्रतिभा गावडे, सुरेश व हेमलता गावडे यांचा तर सर्पमित्र गोविंद गवंडे व दशावतारी कलाकार यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गावात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आई व वडील या दोघांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीला शिक्षणासाठी संस्थेकडून १५ हजार तर कार्यक्रमात सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्यामार्फत रोख १० हजार आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी तर आभार संतोष गावडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page