कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मधुन भारतीय जनता पक्षातर्फे मला उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी सुद्धा मी विजयीच होईन याची मला खात्री होतीच… तरीपण मला पक्षातर्फे मिळालेली उमेदवारी नाकारून मी निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला. गेली कित्येक वर्षे मी भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिकपणे काम करीत आहे. माझ्यासोबत माझे अनेक सहकारी कुडाळ शहरात पक्षासाठी तन-मन-धन खर्ची करून एका विचाराने आणि एका ध्येयाने प्रेरित होऊन काम करत आहेत. पक्षाचे काम करताना आम्हाला ना कुठल्या सत्तेची आस होती, ना ही कुठल्या पदाची…! भारतीय जनता पक्षाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार तळागाळात रूजवण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध आहोत. ‘पार्टी विथ डिफरन्स’ ही पक्षाची ओळख आम्ही सर्वांनीच अभिमानाने मिरवली. कालांतराने केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे चीज झाले, याचा आम्हा सर्वांनाच आनंद झाला. मात्र सत्ता येताच भारतीय जनता पक्षात बाहेरच्या दलबदलू कार्यकर्त्यांनी जास्त गर्दी केली. राजकारणात पक्षसंघटना वाढीसाठी नवनवीन नेते आणि कार्यकर्ते यांचा समावेश करावाच लागतो. त्यामुळे त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र नवीन कार्यकर्त्यांना पक्षात समाविष्ट करून घेत असतानाच आपण पक्षाचा झेंडा वर्षानुवर्षे खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय तर करत नाही ना याचाही विचार पक्षश्रेष्ठींनी करायला हवा. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत तिकीट वाटप करताना भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा कुठेही विचार झालेला नाही, असेच खेदाने म्हणावे लागेल.

ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कधी पाऊल ठेवले नाही, ज्यांना पक्षाची विचारधारा काय आहे याची किंचितही जाणीव नाही, अशा उपऱ्यांना भाजपतर्फे नगरपंचायत निवडणुकीत तिकीट वाटप करण्यात आले आहे. त्याच वेळी ज्यांनी माझ्यासोबत पक्षासाठी पडत्या काळात खचता खाल्ल्या आणि आपले संपुर्ण आयुष्य केवळ पक्षाखातर पणाला लावले अशा माझ्या निष्ठावंत सहकाऱ्यांना नगरपंचायत निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आलेले आहे. माझ्या निष्ठावंत सहकाऱ्यांना पक्षाने तिकीट नाकारलेले असताना मी पक्षातर्फे निवडणुक लढवणे माझ्या अंतर्मनाला योग्य वाटत नाही. त्याचबरोबर निष्ठावंत सहकाऱ्यांवर अन्याय झाला म्हणुन भारतीय जनता पक्ष सोडुन दुसऱ्या पक्षातुन निवडणुक लढवणे किंवा अपक्ष निवडणुक लढवण्याचा विचार मी स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. भारतीय जनता पक्षाचे काम मी शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार, हे निश्चित आहे. मंदिराच्या पूर्णत्वानंतर शिल्पकाराची गरज भासत नाही. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत तिकीट वाटप करताना भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या अन्यायाचा निषेध म्हणुन मी पक्षातर्फे मला देण्यात आलेली उमेदवारी नाकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page