कुडाळ /-

सर्वाधिक लोकप्रिय अशा सा रे ग म प लिटिल चॅंप या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दिनांक ०५ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये कुडाळ तालुक्यातील पडवे गावची बारा वर्षीय सिंधुदुर्गकन्या कुमारी. गौरी गोसावी हीने आपल्या सुरेल स्वरांनी आणि बहारदार सादरीकरणाने महाअंतिम फेरीत इतर स्पर्धकांवर मात करत महाराष्ट्राची महागायिका बनून या स्पर्धेची महाविजेते पद पटकावले.
सध्या चारकोप ; मुंबई येथे वास्तव्यास असलेली आणि डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूल, बोरीवली (प) मुंबई. या शाळेची विद्यार्थीनी असलेल्या गौरीने सुरुवातीपासूनच एकापेक्षा एक सरस गाणी सादर करत परिक्षकांसह रसिकांची मने जिंकत तब्बल १५ वेळा वरचा सा मिळवत १५ गोल्डन तिकिटे मिळवली आणि दिमाखात महाअंतिम फेरीत दाखल झाली. आणि अंतिम विजेतेपद मिळवत महाराष्ट्राची महागायिकाही बनली. या स्पर्धेचे परीक्षक असलेले रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन या महाराष्ट्राच्या लाडक्या पंचरत्नांनी नेहमीच गौरीच्या गायनाचे कौतुक केले. तसेच सारेगमप मधील वाद्यवृंद आणि विशेष अतिथी परिक्षक म्हणून येणाऱ्या दिग्गज गायक आणि कलाकारांनीही गौरीला भरभरून दाद दिली. यामध्ये संगीतक्षेत्रातील जागतिक पातळीवरील व्यक्तिमत्त्व असलेल्या संगीतकार आणि गायिका उषा मंगेशकर यांनी तर चक्क गौरीच्या आवाजाची आणि गायनाची तुलना महागायिका आशा भोसले यांच्या सोबत केली आणि गौरीचे मनापासून कौतुक केले. गौरीला मिळालेली ही दाद तिचा उत्साह वाढवणारी आणि संस्मरणीय अशीच ठरली.
गौरीचे वडील भूषण गोसावी हे मुंबई महानगर पालिकेत अभियंता आहेत तर आई भक्ती गोसावी या मुंबई अंधेरी येथे विद्या विकास हायस्कूल मध्ये शिक्षीका आहेत
” गौरीचे यश गोसावी समाजातील मुलांना प्रेरणादायी ” – विनोद गोसावी , अध्यक्ष नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबई.
रविवारी महाअंतिम फेरीत गौरी गोसावी महागायिका किताब जिंकल्याचे घोषित होताच मुंबईसह सिंधुदुर्गात सोशल मिडीयावर तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला. सिंधुदुर्ग आणि मुंबईतील गोसावी समाजाच्या वतीने लिटिल चॅंप गौरीचे अभिनंदन करताना नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री. विनोद गोसावी यांनी अशी प्रतिक्रिया दिली कि,
” आपल्या गौरीचा परफाॅरमन्स हा सुरूवातीपासूनच चांगला झाला, नव्हे तो पुढे बहरतच गेला. त्यामुळे ती महागायिका होईल असे वाटतच होते आणि आज ती महागायिका झाली. आज आपल्या गोसावी समाजाची सुकन्या कु. गौरी गोसावी हिने इतिहास घडविला. खरचं आजचा दिवस हा गोसावी समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे. कुमारी गौरी गोसावी ही सारेगमप लिटिल चॅम्प स्पर्धेतील अंतिम महाविजेती ठरली आणि तिने तिच्याबरोबरच आपल्या गोसावी समाजाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोचविले. आणि प्रत्येक समाजबांधवाचा उर अभिमानाने भरून आला. सर्वांनीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एका चिमुकल्या १२ वर्षाच्या आमच्या कन्येचा संगीत क्षेत्रातील हा प्रवास कौतुकास्पद तर आहेच पण तो थक्क करणारा आणि समाजातील इतर मुलांना आणि कलाकारांना प्रेरणादायी असा आहे. समस्त गोसावी समाजाला ही गोष्ट निश्चितच भूषणावह व अभिमानास्पद आहे. आम्हा सर्वांचे आशिर्वाद सदैव तिच्या पाठीशी राहतील. असे सांगून गौरीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो = गौरी गोसावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page