वेंगुर्ला  /-

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीबरोबरच आंबा,काजू या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून जनतेला आधार द्यावा,अशी मागणी एम. के. गावडे यांनी केली आहे.यावेळी बोलताना एम.के.गावडे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे.आंबा पिकाचे फ्लॉवरिंग चांगल्या प्रकारे होत होते.थंडीलाही सुरुवात झाली होती.मात्र अचानक महिनाभर झालेल्या पावसामुळे झालेले फ्लॉवरिंग नष्ट झाले आहे.जमिनीमध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे जानेवारी – फेब्रुवारी मध्ये फ्लॉवरिंग होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या हातात आंबा पीक येणे मुश्किल आहे. हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच प्रगतशील शेतकरी काही प्रमाणात या परिस्थितीवर मात करू शकतात. मात्र सर्वसामान्य शेतकरी कर्जाच्या खाईतच लोटला जाईल.यापूर्वी पावसामुळे भात शेतीही पाण्यात गेली. कोकणातील दुसरे महत्त्वाचे पीक म्हणजे काजू. मात्र या पिकाचे सुद्धा ६० ते ७० टक्के नुकसान झालेले आहे. कोकणातील शेतकरी आंबा – काजू पिकावरच उदरनिर्वाह करीत असतो. भातशेतीसाठी वापरलेले खत, बियाण्याचे कर्जही याच फळपीक उत्पन्नातून भरीत असतो.विमा कंपन्यांकडून मिळणारी नुकसानभरपाई फारच तुटपुंजी असते.या सर्व बाबींचा विचार करता शेतकरी उभा राहू शकत नाही. शासकीय अधिकारी यांनी योग्य अहवाल सादर केला व शासनाने वास्तववादी अहवाल तयार करून नुकसानभरपाई दिल्यास काही प्रमाणात शेतकरी उभा राहू शकेल. अवकाळी पावसामुळे नगदी पिकांचे नुकसान तर झालेले आहे, पण त्याचबरोबर जनावरांचे वैरण सुद्धा नाहीशी झालेली आहेत. या सर्व बाबींचा विचार करता शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून जनतेला आधार द्यावा, असे यावेळी बोलताना कृषिभूषण  तथा प्रगतशील शेतकरी एम. के. गावडे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page