कुडाळ आणि देवगड मतदारसंघात सामाजिक परिवर्तनाचा अराजकीय शक्तीप्रयोग.

कुडाळ /-

गाव करेल ते राव काय करेल, अशी एक म्हण आहे. परंतु कोकणात पक्षीय राजकारणामुळे गावाला एकीचा विसर पडला आहे. त्यामुळे विकासाचे राजकारण कोकणात कमकुवत झाले आहे आणि योग्य माणसे या प्रवाहापासून दूर फेकली जातात. उडदामाजी काळे-गोरे म्हणतात तसे सर्वच राजकीय पक्षात चांगले वाईट उमेदवार असतात. महाराष्ट्र लोकाधिकार समिती पक्षीय राजकारण न करता चांगले उमेदवार कुडाळ आणि देवगड नगरपालिकेत निवडून जावेत यासाठी प्रचार आणि प्रसार यंत्रणा राबवणार आहे. जेणेकरून लोकांच्या हक्काचा विकासाचा पैसा योग्यप्रकारे लोकांच्या सोयीसुविधांसाठी खर्च होईल. महाराष्ट्र लोकाधिकार समिती आणि अन्य सेवाभावी संस्था-संघटना एकत्र येऊन प्रायोगिक तत्वावर हा अराजकीय शक्तीप्रयोग करत योग्य उमेदवार सत्तेत पोहोचवणार, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर आणि कार्याध्यक्ष अविनाश पराडकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र लोकाधिकार समितीने एक प्रसिद्धीपत्रकही छापले असून त्याचे वितरण जोरदारपणे होत आहे. त्यात म्हंटले आहे की निवडणूका जाहीर झाल्यानंतर आपल्याकडे एक माहौल तयार होतो. निवडणूकचा फेस्टिव्हलच फन-फेअर बनतो. परंतु चार दिवसांचा कुंभमेळा म्हणून कुठल्याही अंगाने निवडणुकीकडे कोणी सहजतेने पाहू नये. फक्त सैनिक बनून देशाच्या सीमेवर बंदूक घेऊन उभे राहणे ही आपली देशसेवेची व्याख्या झाली असेल तर आता ती बदलायला हवी. स्वतःला बदलून खूप काही बदलू शकता, अगदी देशदेखील.

देशाला वेगवान विकासाकडे, परिवर्तनाकडे आणि पर्यायाने सामर्थ्यवान महासत्तेकडे नेण्यासाठी कोणीही एक मुख्यमंत्री, पंतप्रधान कधीच पुरेसे ठरू शकणार नाहीत. पण प्रत्येकाने त्या दिशेने फक्त दोनच पावले प्रामाणिकपणे टाकायची ठरवली, तर त्या एका क्षणातच देश प्रगतीकडे दोनशे कोटी पावले पुढे टाकू शकतो. भारतीय लोकशाहीत ही ताकद आहे. फक्त ही ताकद हजार-पाचशे रुपयात आणि दारू-मटणाच्या पार्टीत वाया घालवू नका असे आवाहनही महाराष्ट्र लोकाधिकार समितीने केले आहे.

तुमच्या विकासाचा हक्काचा पैसा तुमच्या दारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी प्रामाणिकपणे हे काम करेल असा माणुस हा तुमचा प्रतिनिधी असला पाहीजे. आज आपल्या सभोवताली काय घडते आहे, काय गोष्टी चालल्या आहेत हे आपण पाहतोच आहोत. उंटाचे पिल्लू गोजिरवाणे वाटते म्हणून तंबूत घेतले, तर ते भविष्यात तंबू फाडूनच बाहेर पडते.

राजकारणाकडे आपण काहीसे घृणेनेच पाहतो, त्याच्यापासून अलिप्त राहतो. परिणाम काय होतो? चाळीस-पन्नास टक्के मतदान होते. अनेक उंटाची पिल्ले त्याचा वापर करून घेत लोकशाहीने दिलेल्या सत्तेच्या तंबूत शिरतात आणि सामान्य नागरिकांना डोईजड होऊन बसतात. राजकीय गुन्हेगारी वाढते, गैरप्रकार वाढतात आणि आपण फुकट लोकशाहीला दोष देत बसतो. अगतिकपणे सगळं सहन करू लागतो. मतदार राजाला औटघटकेचा मुकुट डोक्यावर चढवला जातो आणि खालून धोतर सोडून घेतले जाते. हे आता थांबवा. लोकशाहीचे तंबू उखडणारे आणखी उंट यापुढे पाळू नका. कोणत्याही खोट्या आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार पालिकेत जाईल हे पहा. भले तो आजच्या राजकीय स्टाईलने पैसे खर्च करू शकत नसेल, गरीब असेल, पण भविष्यात स्वार्थाने पैसे कमावण्यासाठी राजकारणात आलेला नसेल. उमेदवाराचा प्रामाणिकपणा तपासून पहा. तुमच्या हक्काचा विकासाचा पैसा ठेकेदारी आणि मक्तेदारीतून गैरप्रकारांना जन्म देणारा ठरता कामा नये. तुमची मुलंबाळं, कुटुंब असुरक्षिततेच्या छायेत जगता कामा नयेत. सुरक्षित सामाजिक वातावरण हा त्यांचा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका.

यासाठी, तुमच्या कष्टाचा, तुमच्या विकासासाठी असलेला पैसे हा फक्त तुमच्या दारात प्रगतीची, आशेची आणि सुरक्षित आयुष्याची किरणे घेऊन येईल यादृष्टीने तुमचा उमेदवार निवडा असे परखड आवाहन महाराष्ट्र लोकाधिकार समितीने पत्रके छापून केले आहे.

पक्ष कोणताही असो, योग्य उमेदवार ठरवून त्याच्या विजयासाठी काम करण्याच्या समितीच्या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात हलचल माजली आहे हे निश्चित. आपल्याकडून चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांना करावाच लागेल असे यावेळी ॲड.प्रसाद करंदीकर व अविनाश पराडकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page