कणकवली /-

केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही बघून घेईन अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत. मात्र नारायण राणेंनीच वेळोवेळी गद्दारी केली असल्याने गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही. नारायण राणेंनी सत्तेसाठी सुरुवातीला शिवसेनेबरोबर गद्दारी करत काँग्रेस मध्ये प्रवेश केला.काँग्रेस मध्येही त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. त्याला वर्ष होण्याअगोदर स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून राणे ईडी ची कारवाई टाळण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झाले. या कालावधीत राणेंनी त्या त्या पक्षातील अनेकांशी गद्दारी करूनच पदे मिळविली. त्यामुळे वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या राणेंनी गद्दारी या विषयावर बोलू नये आणि कोणाला उपदेशही देऊ नये असा टोला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नारायण राणेंबरोबर नाहीत हे हळूहळू स्पष्ट होत चालले आहे.भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राणेंच्या मुलांना स्वीकारत नाहीत त्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावून त्यांना आपल्या दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न राणे करत आहेत. भाजप मध्ये दाखल झालेले राणे कुटुंबीय हे भाजपच्या भल्यासाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी दाखल झाले आहे. सत्ता असेल त्या पक्षात प्रवेश करून राणे स्वतः सत्तेचा उपभोग घेऊन आपल्या दोन्ही मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत आहेत हे आता लपून राहिले नाही. राणेंची दहशत सिंधुदुर्गच्या जनतेने याआधीही मोडीत काढली आहे. आता भाजप कार्यकर्त्यांना धमकावून राणे पुन्हा जिल्ह्यात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जिह्यातील जनता राणेंची दहशत खपवून घेणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता व कार्यकर्ते कोणाबरोबर आहेत हे स्पष्ट होईल. रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत राणेंचा सुपडा साफ झाला तेथील मतदारांनी राणेंना त्यांची जागा दाखवली आहे. सिंधदुर्गमध्येहि याची पुनरावृत्ती होईल. असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page