देवगड /-

त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत व्हावी तसेच ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना तत्काळ अटक करावी आणि दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन देवगड भाजपातर्फे शासनाला देण्यात आले.

यावेळी भाजपचे माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, नगराध्यक्ष प्रियांका साळसकर सभापती रवी पाळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांना हे निवेदन सादर केले. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, उपसभापती रवी तिरलोटकर, महिला बाल कल्याण सभापती प्राजक्ता घाडी, प्रणाली माने, उजवला अदम शहर अध्यक्ष योगेश पाटकर आदी उपस्थित होते. या निवेदनात नमूद केल्या प्रमाणे त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. याचा भारतीय जनता पार्टी तर्फे निषेध करण्यात आला. जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले. ते कोण्या एका पक्षाचे नव्हते व कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले. त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे. नाहक अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून शासनाने संबंधितावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी भाजपा तर्फे करण्यात आली आहे. भाजपतर्फे शासनाला दिलेल्या निवेदनात सदर दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना तत्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page