मालवण /-

आजच्या ऑनलाईनच्या युगात हरवलेली तरुण पिढी लोककलाकारांना विसरत चालली आहे ही मोठी खंत आहे. लोकांचे मनोरंजन करण्याची ताकद फक्त कलाकारात असते. अशा लोककला जोपासणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्याचा मालवण पंचायत समितीचा उपक्रम स्तुत्य आहे, जिल्हा परिषद लोककलाकारांच्या नेहमीच पाठीशी राहील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी येथे बोलताना केले.

मालवण पंचायत समिती तर्फे लोककला महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या हस्ते आणि पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जि. प. चे वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जि. प. सदस्य संतोष साटविलकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, भाजपचे बाबा परब, पं. स. सदस्य अशोक बागवे, मनीषा वराडकर, ज्येष्ठ दशावतार कलावंत ओमप्रकाश चव्हाण आदी व इतर उपस्थित होते. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे व ओमप्रकाश चव्हाण यांच्यासह पुरुषोत्तम खेडेकर (आमडोस), सुधीर तांडेल (वराड), सुहास माळकर (कोळंब), गुणाजी घाडीगांवकर (ओवळीये) विनायक येरागी (दांडी), विनांद परब (दांडी), जीजी चोडणेकर (देवबाग), यशवंत घाडी (चिंदर), विठ्ठल तळवडेकर (मठ बुद्रुक), शामसुंदर आचरेकर (पेंडूर), तुकाराम काणे परब (ढोलकीपटू), विठ्ठल गुरव (आचरा), विलास वालावलकर (देवबाग), राजेंद्र कोदे (कांदळगाव), अरुण पालकर (सुकळवाड), लक्ष्मण दळवी (तळगाव), भालचंद्र केळुसकर (वायरी), आत्माराम पालव (सुकळवाड) आदी दशावतार व भजनी कलाकारांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी अजिंक्य पाताडे यांनी प्रास्ताविक करताना ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लोककला व त्यातील कलाकार यांचा यथोचित सन्मान करण्याच्या दृष्टीने व जुन्या वृद्ध कलाकारांना पुन्हा एकदा रंगमंचावर आपली कला सादर करता यावी यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले. कलाकारांची शासन दफ्तरी नोंद करण्याबरोबरच वृद्ध कलाकारांना मानधन मिळवून देण्यासाठी पंचायत समिती प्रयत्नशील असल्याचेही पाताडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, गेली ५० वर्षे आपण कळसूत्री बाहुल्यांची कला जोपासली. लोकांचे मनोरंजन करतानाच शासनाचे जनजागृती कार्यक्रमही या कलेद्वारे सादर करत लोकांमध्ये जागृती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page