सिंधुदुर्गनगरी /-

यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्याचे वेतन व मागील फरक तात्काळ देण्यात यावा. या मागणीसाठी आज यांत्रिकी उपविभाग रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदकडे रोजंदारीवर कार्यरत असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना कायम करून चार महिन्यांपेक्षा जादा कालावधी लोटला तरी त्यांना अद्याप वेतन सुरू करण्यात आलेले नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या या कर्मचाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत व जि प समोर उपोषण करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. सन १९८६ पासून जिल्हा परिषदेकडील हातपंप विद्युतपंप देखभाल दुरुस्तीसाठी रोजंदारीवर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालय कोल्हापूर यांनी दिले होते. या आदेशानुसार जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने त्या नऊ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडून शासनस्तरावर प्रस्ताव सादर केला गेला होता. यावर निर्णय होऊन जिल्हा परिषदेच्या देखभाल- दुरुस्ती खाते क्रमांक ३४३ मधून यासाठी ९० लाख रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. २२ जून रोजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी संबंधिताना कायम केल्याबाबतचे पत्र दिले होते. मात्र मागील चार महिने या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. तसेच देय असलेला मागील वेतन फरकही प्रलंबित आहे. वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी सणापूर्वी हे वेतन व फरक आपल्याला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, अद्याप याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने त्या कर्मचाऱ्यांनी आज पासून जिल्हा परीषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. यावेळी प्रदीप वाडेकर, बाळकृष्ण सावंत, दत्ताराम सरमळकर, चंद्रकांत सावंत, विकास घाडीगावकर, आदि कर्मचारी या उपोषणात सहभागी झाले आहेत तर जो पर्यन्त न्याय मिळत नाही तोपर्यन्त माघार घेणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page