सावंतवाडी /-

सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांडाचे गुढ उकलण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात संशयित असलेला आणि आत्महत्येचा प्रयत्न करून गेले काही दिवस बेपत्ता असलेला कुशल टंगसाळे याने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे तसेच पाच लाख रुपये देणे असल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांसाठी आपण हा प्रकार केला, अशी कबुली त्याने आज पोलिसांना दिली. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. गेले १४ दिवस सुरू असलेल्या या पळापळीच्या नाट्याला अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे.

शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात बेपत्ता होत विष प्राशन केल्यानंतर पुन्हा एकदा नाट्यमय रित्या बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी ठाणे येथून त्याला ताब्यात घेण्यात घेतले. सावंतवाडीत आणल्यानंतर त्या युवकाची येथील पोलिस ठाण्यात कसून चौकशी केल्यानंतर अखेर त्याने खुनाची कबुली दिली. कुशल हा मृत नीलिमा खानविलकर यांचा शेजारी असून पैशांची गरज असल्याने दागिन्यांच्या हव्यासापोटी त्याने हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी याबाबतची माहिती दिली.

यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, सहा. पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांचे विशेष अभिनंदन केले.

शहरातील उभाबाजार परिसरात राहणाऱ्या नीलिमा खानविलकर व शालिनी सावंत यांचा गळ्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या खळबळजनक दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा तपासकामाला लागली होती. यात सावंतवाडी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीम पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होत्या.

या प्रकरणात खून झालेल्या दोन्हीही कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात आली तर खून झालेल्या कालावधीत त्या परिसरात कोण कोण वावरत होते. त्या खून झालेल्या घरात कोण कोण जाऊन आले त्यांची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली होती तसेच त्या दोघांनाही पोचवले जाणाऱ्या जेवणाच्या डब्याचा वेळ याची देखील पोलिसांनी माहिती मिळवली. मात्र, खून सुरुवातीपासूनच या तपासाबाबत पोलिसांकडून चांगलीच गुप्तता बाळगली जात आहे.

या पार्श्वभूमीवर खुनाच्या तपासासाठी अनेक जणांची चौकशी सुरू असतानाच चौकशीसाठी बोलावलेल्या एका युवकाने चौकशीच्या ससेमिऱ्याच्या भितीने बेपत्ता होत विषप्राशन केले होते. त्यावेळी त्याच्या पत्नीने दिलेल्या बेपत्ताच्या तक्रारीनंतर पोलीसांनी त्याला वेंगुर्ला येथून ताब्यात घेतले होते. मात्र, विष पिल्याने अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून डॉक्टरच्या सल्ल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते. मात्र, ९ नोव्हेंबर रोजी उशिरा तो पुन्हा नाट्यमयरित्या बेपत्ता झाला. त्यामुळे संशयाची सुई त्या युवकाकडे वळली.

दुसऱ्यांदा बेपत्ता झालेल्या त्या युवकाचे प्रथम लोकेशन हे आंबोली पारपोली भागात आढळून आले होते. ज्या परिसरात लोकेशन आढळले त्या ठिकाणी पोलिसांनी जात तपास देखील केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्या होत्या.

मात्र, त्याचा काही सुगावा लागला नाही. त्यानंतर त्याचे मोबाईल लोकेशन मुंबई ठाणे परिसरात आढळून येताच पोलिसांनी मुंबई गाठत त्याचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेत सकाळी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, याला पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला नव्हता. त्या बेपत्ता युवकाला कधी व कुठे कसे ताब्यात घेतले याबाबत कोणतीही माहिती देण्यास पोलिसांकडून थेट नकार दिला जात होता. तसेच या तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page