वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर घोडेमुख येथील एका कठडा नसलेल्या विहिरीत आज सकाळी ६.३० च्या दरम्यान खवले मांजर पडले असल्याचे दिसून आले. वनविभागाला या बाबत माहिती मिळताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्या खवले मांजरास विहिरीतून सुखरूप पणे बाहेर काढून जीवदान दिले, आणि त्यास नैसर्गिक अधिवासात सोडले.

वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर घोडेमुख येथील भगवान वासुदेव गावडे यांच्या घरामागील कठडा नसलेल्या विहिरीत आज शनिवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० च्या दरम्यान खवले मांजर पडले असल्याचे दिसून आले. त्यांनी पेंडूर घोडेमुख सरपंच श्रीम. गीतांजली कांबळे यांचे माध्यमातून वनविभागास याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाच्या बचावपथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने त्या १० ते ११ फूट खोल विहिरितून त्या खवले मांजरास स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. तदनंतर सदर वन्यप्राणी खवलेमांजराची पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आले.

यावेळी उपस्थित कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होण्याऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचं प्रमाण अधिक असल्याचं WWF या आंतरराष्ट्रीय संस्थेने निरीक्षण नोंदविले आहे. तसेच इंटरनेशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर या संस्थेनेही खवले मांजरास रेड लिस्ट यादीत वर्गीकृत केले आहे. या अतिशय दुर्मिळ, संकटग्रस्त अद्वितीय सस्तन प्राण्याच्या संरक्षणसाठी शासन विविध स्तरावर प्रयत्नशील असून त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे अनुसूची १ मध्ये वर्गीकृत केले असल्याने त्यास संरक्षण प्राप्त आहे. खवले मांजर शिकार/तस्करी करिता ७ वर्ष इतक्या कारावासाची तरतूद करणेत आलेली आहे.

पेंडूर घोडेमुख येथील ग्रामस्थांनी खवले मांजराचा जीव वाचवून वन्यप्राण्यांबाबत असणाऱ्या संवेदनशीलता आणि आत्मीयतच चांगलं उदाहरण समाजासमोर ठेवलं असलेने वनविभागाच्या वतीने सर्वांचं कौतुक करून आभार मानण्यात आले.

दरम्यान पेंडुर येथील हे बचाव कार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री शहाजी नारनवर, सहायक वनसंरक्षक (खा कु तो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगावकर व वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मठ श्री. अ. स. चव्हाण, वनरक्षक मठ श्री. सूर्यकांत सावंत, वनमजुर श्री. संतोष इब्रामपुरकर, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ देवा कांबळी, विजय मोरजकर, श्याम गावडे, गोविंद गावडे, शांताराम गावडे, रविंद्र गावडे महेश नाईक यांच्या मदतीने यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page