मालवण /-

मालवण तालुक्यात कर्ली खाडी पात्र आणि गडनदीच्या कालावल खाडी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून ठिकठिकाणी तेथील ग्रामस्थांकडून या वाळू उपशास विरोध होत असताना प्रशासन मात्र झोपी गेलेल्या अवस्थेत दिसत आहे. तालुक्यात कर्ली खाडी पात्रात आंबेरी, देवली याठिकाणी देखील अवैध वाळू उपसा सुरू आहे. काल मर्डे डांगमोडे येथे गडनदीच्या पात्रात होत असलेल्या वाळू उपशावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार कारवाई झाली असताना कर्ली खाडी पात्रातील वाळू उपशावर प्रशासन कारवाई करणार कधी? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

मालवण तालुक्यातील कर्ली खाडी पात्रात आंबेरी व देवली याठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू आहे. डंपर द्वारे होणाऱ्या वाळूच्या अवजड वाहतुकीमुळे तेथील रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. या वाळू वाहतुकीमुळे चौके – कुडाळ मार्गावरही खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ वेळोवेळी आवाज उठवत असताना महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.

मर्डे डांगमोडे येथील गड नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशास स्थानिक ग्रामस्थानी विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतर जाग आलेल्या महसूल प्रशासनाने त्याठिकाणी रॅम्प उध्वस्त करत कारवाई केली. तर काही दिवसांपूर्वी कालावल हुरासवाडी येथे ग्रामस्थानी वाळू वाहतूक करणारा डंपर अडविल्याने मोठा वाद व धक्काबुक्की झाल्यावर ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही ठोस कारवाई झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर तालुक्यात कर्ली खाडी पात्रात आंबेरी, देवली याठिकाणी सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर प्रशासन कारवाई करणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page