ओरोस /-

अवसायनात गेलेल्या भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गारगोटी या पतसंस्थेने आपल्या ठेवीदारांच्या एकूण मुद्दलच्या १० टक्के ठेवी परतफेड करण्यास सुरुवात केली आहे. ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत या ठेवी देण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या ठेवींची परतफेड झालेली नाही त्या नागरिकांनी तात्काळ क्लेम करावा, असे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या अधीक्षक श्रीमती यु यु यादव यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गारगोटी ही पतसंस्थेची कर्ज थकबाकी वाढल्याने २००७ मध्ये अवसायनात गेली आहे. त्यामुळे संस्थेच्या विविध ठेवीदार, ठेवीदार संघटना व कर्जदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल केल्या होत्या. यावरील सुनावणीत कर्ज वसुलीची कारवाई ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच प्रमाणे अवसाययान समिती भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गारगोटी अध्यक्ष यांनी ठेवीदारांच्या एकूण मुद्दलच्या १० टक्के रक्कम ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पतसंस्थेचे असंख्य ठेवीदार आहेत. त्यांची अद्याप मुद्दल मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांनी आपली रक्कम मिळण्यासाठी भुदरगड पतसंस्थेकडे विहित मुदतीत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन श्रीमती यादव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page