वेंगुर्ला /-

सिंधुदुर्ग जिल्हा कलाकारांची खाण आहे. यामध्ये दशावतार, बाहुली नाट्य, भजनी बुवा, हार्मोनियम वादक, तबला वादक, गायक अशा अनेक कलांनी समृद्ध असणारा हा सिंधुदुर्ग जिल्हा. या जिल्ह्यांमध्ये दर्या खोऱ्यात वसलेला धनगर समाज बांधव शेळ्या-मेंढ्या राखत रानोरानी फिरत ,भटकंती करत आपला उदरनिर्वाह करीत आहे. म्हाळ, दसरा, दिवाळी, पाडवा तसेच घरगुती कार्यक्रमासाठी मनोरंजन व श्रमापरीहार करण्यासाठी आपली संस्कृती जपत चपय नृत्य तथा गजा नृत्य सादर करीत असतात. एवढेच नव्हे तर नवरात्रोत्सवात, सार्वजनिक गणेशोत्सव आदी कार्यक्रमासाठी या चपय नृत्य कलाकारांना नृत्याविष्कार यासाठी निमंत्रित केले जाते. आज पर्यंत चपय नृत्य तथा गजा नृत्याला मुंबई, दिल्ली दरबारापर्यंत पोहोचविण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही कलाकार करीत आहेत.

‘चपय नृत्य तथा गजा नृत्य म्हणजे ढोल, थाळा, बासरी यांच्या तालावर अंगात घोळदार व भरजरी वस्त्रालंकारानी सजविलेला झगा, कमरेला कंबर पट्टा, डोक्याला पागोटे, पायात वाकी तथा चाळ, हातात वेताची काठी या सर्वांच्या सहाय्याने ढोल थाळा यांच्या तालावर आणि बासरीच्या सुरावर तसेच हार भला चांग भला यांच्या गजरात सादर केला जाणारा कलाविष्कार’

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे वास्तव्य करणारे श्री राया लांबर वय वर्ष 72 हे वयोवृद्ध कलाकार या चपय नृत्य कलेमध्ये पारंगत असून लहानपणापासून आपला कलाविष्कार महाराष्ट्र, गोवा राज्यामध्ये प्रसंगानुरूप श्री अंबा सिद्धाई चपय नृत्य ग्रुप कोलगाव च्या वतीने चपय नृत्य तथा गजा नृत्य सादर करीत आहेत. यामध्ये त्यांना लक्ष्‍मण लांबर, सिताराम लांबर, जयदेव लांबर, संतोष लांबर, बाबु कुंभार,धाकू पाटील, बिरू पाटील, भैरू पाटील, जानू पाटील, अनिकेत कुंभार, विवेक पाटील, मनोहर शेळके, बाबू शेळके, सुनील वरक, बलराम कुंभार, अक्षय लांबर, बबन लांबर, आकाश लांबर,आदित्य लांबर, धाऊ झोरे, बाबू खरात, भागू खरात, गंगाराम खरात आदी व्यक्तींची साथ लाभत आहे.

एवढेच नव्हे तर सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक आदी ठिकाणी समाजातील बांधवाचे निधन झाल्यानंतर बाराव्या दिवशी ‘माळ लावण्या’ची प्रथा आहे. यामध्ये जागर करण्यासाठी पौराणिक, जुन्या काळात होऊन गेलेल्या सत्य कथानकावर आधारीत कथा गीत गायन कोणत्याही साहित्याचा वापर न करता केले जाते. यामध्येही श्री राया लांबर हे बाबू खरात लक्ष्‍मण लांबर, गंगाराम खरात, सिताराम लांबर यांच्या सहकार्याने उत्कृष्ट कथा गीत गायन करीत आहेत. या कथा गीत गायन या कलाविष्कारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाटू काळे, लक्ष्मण काळे, धाकु लांबर, भैरू झोरे, सोनू झोरे, शाहू खरात आदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी,दोडामार्ग तालुक्यातील ठराविक बांधव पारंगत आहेत.
अशा चपई नृत्य व कथा गीत गायन करणारे श्री राया लांबर सामाजिक सलोखा, आपापसात आपुलकी, प्रेम तसेच शांतता राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार्या गुणवंत, वयोवृद्ध कलाकार श्री राया लांबर यांच्या कलेचा गौरव श्री महालक्ष्मी उत्कर्ष कला क्रीडा मंडळ आकेरी घाडीवाडी च्या नवरात्रोत्सवात आकेरी गावचे सरपंच तथा मंडळाचे अध्यक्ष श्री महेश जामदार यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री महालक्ष्मी कला क्रीडा मंडळ आकेरी घाडीवाडी चे सचिव नारायण सावंत, खजिनदार चंद्रकांत घाडी, सूर्यकांत घाडी, सिद्धेश घोगळे, रवींद्र घाडी, उल्हास जामदार, विनायक घाडी, अंकुश घाडी, सुहास सावंत, मनोज सावंत, निलेश केसरकर, लक्ष्मण सावंत, आशुतोष घाडी, आकेरी गावचे ग्रामस्थ, कलारसिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सिताराम लांबर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page