सावंतवाडी /-

सिंधुदुर्गातील सरमळे-सावंतवाडीतील अनिल कांबळे-सरमळकर या होतकरू प्रतिभावंत नाटककाराचा कौतुक सोहळा तसेच त्‍यांनी लिहिलेल्‍या ‘द फॉक्‍स’ या नाट्यपुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिंधुरत्न फाऊंडेशनतर्फे बुधवारी सायंकाळी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे पार पडला. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, श्रीराम वाचन मंदिरचे रमेश बोंद्रे, मालवणी कवी दादा मडकईकर, डॉ. अमोल पावसकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, इर्शाद शेख, अँड. संदीप निंबाळकर, सिंधुरत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परुळेकर, नाटककार अनिल कांबळे-सरमळकर, श्री. जाधव आदी उपस्थित होते. सरमळे-सावंतवाडीतील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील एका युवकाने आपल्या संघर्षमय जीवनातूनच प्रेरणा घेऊन ‘द फाॅक्स’ नाटक इंग्रजीतून लिहिले. सरमळे सारख्या निसर्गरम्य पण एका दुर्लक्षित गावातील दलित कुटुंबात जन्मलेला अनिल कांबळे-सरमळकर यान परिस्थितीवर मात करत यश संपादन केले. सावंतवाडी, वेंगुर्ले येथून बी. ए. करत कणकवलीमधून इंग्रजी विषयात एम. ए. पदवी प्राप्त केली. एवढे करूनही न थांबत वैयक्तिक अनेक कटू अनुभवांंवर मात करून एक काव्यात्मक साहित्यिक दृष्टिकोन जोपासला. त्याने गेल्या दहा-बारा वर्षांत अनेक कथा, कादंबऱ्या तर लिहिल्याच तसाच चित्रपटही लिहिला. त्याचबरोबर मानवी सत्तांध, भयावह व भेसूर प्रवृत्तीवर प्रभावी भाष्य करणारे “द फाॅक्स”हे इंग्रजी नाटक लिहिलं. या “द फाॅक्स” नाटकाची दखल नामवंत विद्रोही ब्रिटिश लेखक कवी व सामाजिक कार्यकर्ते बेंजामिन झेपानिया यांनी घेतली. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील जगप्रसिद्ध “ब्राॅड वे” या नावाजलेल्या थिएटर रिसर्च सेंटरमध्ये त्याचे वाचन देखील झाले आहे. पुढील काळात या नाटकाचे प्रयोग ‘ब्राॅड वे’ मध्ये होणार आहेत. अमेरिकेतील नावाजलेल्या येल युनिव्हर्सिटीतील थिएटर रिसर्च विंगने नवोदित नाटककारांच्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी “द फाॅक्स” ह्या नाटकाला स्वीकारले आहे. अशा या पोस्ट माॅडर्न थिएट्रीक्स प्रकारातील नाटकाचे संपादन व प्रकाशन दिल्ली येथील मॅचवर्ड प्रेसने हल्लीच काही दिवसांपूर्वी केले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनिल कांबळे सरमळकर यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page