नवी दिल्ली/-

देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे चिंता वाढली आहे. यंदाची दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? याची भीती व्यक्त केली जात आहे.

वीज संकटाचा धोका केवळ भारत नव्हे तर चीन, युरोप आणि अमेरिका इथंही निर्माण झालं आहे. त्यात ऑक्टोबर महिन्यात वीजेची मागणी वाढली आहे. दिल्ली, पंजाब, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने बिघडत्या परिस्थितीवर केंद्राकडे बोट दाखवलं आहे. केरळ, महाराष्ट्रच्या नागरिकांना वीज काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन केले जात आहे. भारत वीज संकटाच्या दिशेने जात आहे का? चीनप्रमाणे देशातील अनेक भागात अंधार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या ७ ऑक्टोबरच्या रिपोर्टनुसार, देशात १३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकट आलं आहे. १६ प्रकल्पात तर एक दिवसाचा कोळसा साठाही शिल्लक नाही. ३० प्रकल्पांकडे १ दिवसाचा कोळसा साठा आहे. तर १८ प्रकल्पात केवळ २ दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. म्हणजे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यात हरियाणा आणि महाराष्ट्र येथे ३ प्रकल्प आहेत. ज्यात एक दिवसाचाही कोळसा शिल्लक नाही. याचसह पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार येथे एक एक प्रकल्प आहेत जेथे १ दिवसाचा साठा आहे.काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून सांगितलं आहे की, अचानक देशात पॉवर प्लांटमध्ये कोळसा संकटाची बातमी समोर आली आहे. एक खासगी कंपनी या संकटाचा फायदा उचलणार आहे का? याचा तपास कोण करणार? तर पेट्रोलनंतर आता वीज दरवाढीचं संकट लोकांवर येणार आहे. कोळसा संकट वाढलं आहे असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून सांगितले आहे.

महाराष्ट्रालाही देशपातळीवरील चुकांचा फटका..

दरम्यान, अतिवृष्टीमुळे खाणींमधून कोळशाचा पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अशातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद असल्याने विजेची तूट निर्माण होत आहे. सणांच्या काळात लोडशेडिंग अटळ असल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दुसरीकडे विजेची तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांनीच आता सकाळी ६ ते १० व सायंकाळीही याच वेळेत विजेचा आवश्यक तेवढाच वापर करावा, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. परिस्थिती बिघडत गेली व कोळशाच्या वेळेत पुरवठा झाला नाही तर आगामी काळात लोडशेडिंगला सामोरे जावे लागणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

भारनियमन होऊ शकते, पण निर्णय राज्यस्तरावर

भारनियमन करावे लागेल अशी सध्यातरी परिस्थिती नाही. जास्तीत जास्त वीज खरेदीचा पर्याय आहे. सध्या ओपन मार्केटमधून वीज खरेदी सुरू आहे. राज्यात सध्या १३ संच बंद पडलेले आहेत. परंतु परिस्थिती बिघडली तर शेती पंप, शहरांसाठी भारनियमनाची शक्यता आहे. शहरात ज्या ठिकाणी वीज चोरी व गळती अधिक आहे अशा ठिकाणी भारनियम होऊ शकते. परंतु याचा निर्णय राज्यस्तरावरून होईल.-सुंदर लटपटे, महावितरण मुख्य अभियंता, लातूर, बीड, उस्मानाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page