सिंधुदुर्गनगरी /-

राज्य शासन व सामान्य प्रशासन विभाग यांच्या सूचनेनुसार दिनांक 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात कोविड 19 लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधुन ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या. यात उद्या 8 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबर या दोन दिवशी जिल्ह्यात मोठ्या संख्येने लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष मुनष्यबळाची व लसींची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यबल समिती (District Task Force) ची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी उजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. सद्यस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोविड 19 लसीकरणाचे उद्दिष्ट 6 लाख 11 हजार 977 इतका आहे. यापैकी 2 लाख 54 हजार 130 (42 टक्के) नागरिकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. 4 लाख 81 हजार 811 (79 टक्के) नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम पंचायत निहाय लसीकरण समिती स्थापन करण्याविषयी सूचना दिल्या. सदर समितीमध्ये संबंधित ग्राम पंचायतीतील ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक/ सेविका व अंगणवाडी सेविका यांचा समावेश असेल. या ग्रामस्तरीय लसीकरण समितीची जबाबदारी पुढीलप्रमाणे असेल- 1) ग्रामपंचायत निहाय पहिला व दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तींची यादी करणे. 2) ग्रामपंचायत निहाय पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या परंतु डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी करणे व त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे. 3) गावात अंथरुणास खिळलेल्या, अपंग व वयोवृध्द व्यक्तींना प्राधान्याने घरोघरी जाऊन लसीकरण करणे. 4) लसीकरणाविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करुन लसीकरणासाठी लाभार्थ्यांना प्रवृत्त करणे. 5) मोहीम कालावधीत 18 वर्षावरील सर्व नागरीकांचे 100 टक्के पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय लसीकरण समितीची राहील. 6) ग्रामस्तरीय लसीकरण समिती मोहीम कालावधीत केलेल्या कामाची दैनंदिन माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयास सादर करेल. ग्रामस्तरीय लसीकरण समिती लसीकरणासाठी आवश्यक इंटरनेट सेवा, इतर मुनष्यबळ व लसीकरणासाठी जागा उपलब्ध करुन देईल. ज्या ठिकाणी इंटरनेट सेवा उपलब्ध होणार नाही त्या ठिकाणी ऑफलाईन पध्दतीने लसीकरण करुन 24 तासांत ऑनलाईन नोंदणी करणेची जबाबदार ग्रामस्तरीय लसीकरण समितीची राहील. ग्रामस्तरीय लसीकरण समितीच्या कामकाजाचे सनियंत्रण तालुका स्तरावरुन गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय लसीकरण समिती करेल. व एकत्रित अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करेल. नागरी भागातील लसीकरणाची जबाबदारी ही संबंधित नगरपालिका मुख्याधिकारी व संबंधित वैद्यकीय अधीक्षक यांची राहील. नागरी भागामध्ये वॉर्डनिहाय लसीकरण सत्रे आयोजित करुन 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या मोहीम कालावधीत लसीकरण करुन घेऊन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page