सावंतवाडी /

सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने कोविड १९ प्रतिबंध व उपययोजनाबाबत गेली दिड वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने या
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना कोविड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.

मार्च २०२० पासून आपल्या देशात कोरोनाने थैमान घातले. यावेळी अनेक संस्था, व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी यांनी पर्वा न करता जमेल तसा कोरोनाविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला. अशा कोरोना योध्यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र, द्वारे राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी गणेश देशमुख (महापालिका आयुक्त – पनवेल ), डॉ. राजेंद्र भारूड (माजी जिल्हाधिकारी,नंदुरबार ) मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी सोलापूर), अमितेश कुमार (पोलीस आयुक्त,नागपूर), डॉ. प्रदीप आवटे ( राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी), डॉ. राजेश देशमुख (जिल्हाधिकारी, पुणे), या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोविड योद्धा सन्मानाने गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास नामदार श्री राजेश टोपे (मंत्री, आरोग्य विभाग, महाराष्ट्र) व नामदार श्री अमित विलासराव देशमुख (मंत्री, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र) हे उपस्थित होते व त्यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मंचावर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष श्री राजा माने, उपाध्यक्ष श्री तुळशीदास भोईटे व सचिव नंदकुमार सुतार उपस्थित होते.

सर्व कोरोना योद्ध्यांचा उल्लेख तसेच कोरोना काळात समाज कसा जागृत होता, शासनास कसे सहकार्य करीत होता, व्यक्ती – प्रशासन – शासन – संस्था त्यांच्या त्यांच्या स्तरावर कसे झटलेत व त्यांच्या कार्याचा उल्लेख नामदार राजेश टोपे व नामदार अमित देशमुख यांनी करून सर्व पुरस्कार प्राप्त योध्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजा माने यांनी केले. आभार संघटनेचे उपाध्यक्ष श्री तुळशीदास भोईटे यांनी व्यक्त केले. या समारंभास प्रतिष्ठानचे सचिव भार्गवराम शिरोडकर व सहसचिव अँड्र्यू फर्नांडिस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page