दोडामार्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे दोडामार्ग तालुक्यातीलही अनेकांना पुराच्या तडाख्याचा सामना करावा लागला. या पूरग्रस्तांपैकी १०९ पूरग्रस्तांना प्रत्येकी ७५०० रुपयांप्रमाणे ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत. तर तौक्ते वादळ आणि त्याआधीच्या पुरातील हानीचे सुमारे दीड कोटी रुपये नुकसान भरपाई अद्याप मिळायची आहे. २०२० मध्ये आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांसाठीचे अद्याप ९५ लाख रुपये शासनाकडून येणे आहेत. शिवाय तौक्ते वादळात शेती बागायतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अद्याप ४५ लाख रुपयेही शासनाकडून येणे आहेत. यावर्षी पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई यायची आहे., अशी माहिती दोडामार्ग महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.

महापूर, चक्रीवादळ आणि परत चक्रीवादळ अशा आस्मानी संकटात तालुक्यातील शेतकरी, बागायतदार आणि नदीकाठचे ग्रामस्थ सापडले. जवळपास तीन चार वर्षे तालुक्यातील आपदाग्रस्त विविध संकटाचा सामना करत आहेत. शासनाच्या सूचनेनुसार महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभाग नुकसानीचे पंचनामे करतात. पण नुकसानभरपाई वेळेत मिळत नाही आणि मिळते तीही अत्यल्प असते. पुराच्या तडाख्यात लोकांच्या बागाच्या बागा वाहून गेल्या. कित्येक वर्षे जगवलेली फळझाडे एका क्षणात जमीनदोस्त झाली आणि शेतकरी कोलमडला. पूर असो नाहीतर वादळ, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने ज्यांच्या घरात पाणी आले, त्यांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये दिले. पण भातशेती व अन्य नुकसानीपोटी द्यावयाचे अडीच हजार मात्र अद्याप दिलेले नाहीत. शासनाकडे निधी नसल्याने गेल्या दोन वर्षांपासूनची भरपाई रखडली आहे. जवळपास दीड कोटी रुपये शासनाकडून भरपाईपोटी यायचे आहेत. ही भरपाईची रक्कम शासनाने लवकरात लवकर जमा करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page