मालवण /-

मालवण शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील पालिकेच्यावतीने फायर बॉलची खरेदी करण्यात आली आहे. हे बॉल ज्याठिकाणी आग लागली त्याठिकाणी टाकल्यास ती आग विझविण्यास मदत मिळणार आहे. अग्निशमन बंब गाडी बंद असल्याने हे फायर बॉल आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरतील असा विश्‍वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद झाली. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी, सन्मेश परब आदी उपस्थित होते. श्री. कांदळगावकर म्हणाले, पालिकेची अग्निशमन बंब गाडी जुनी झाल्याने ती गाडी निर्लेखित करून नवीन अग्निशमन गाडीसाठी शासनाकडे 1 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. अग्निशमन गाडी उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपाययोजना म्हणून पालिकेच्या माध्यमातून फायर बॉल खरेदी करण्यात आले आहेत. शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास या फायर बॉलद्वारे नियंत्रण मिळविणे सोईस्कर ठरणार आहे. हा फायर बॉल दीड किलो वजनाचा असून तो 70 ते 80 डिग्री सेल्सिअस आगीच्या तापमानात टाकल्यास त्याचा स्फोट होऊन तेथील आग विझविण्यात मदत करतो. एक फायर बॉल शंभर स्क्वेअर फूट अंतर काबीज करू शकते. तरी अग्निशमनची गाडी उपलब्ध होईपर्यत शहर परिसरात आग लागल्याची घटना घडल्यास संबंधितांनी पालिकेशी संपर्क साधावा. सद्यःस्थितीत पंधरा फायर बॉल उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा कालावधी हा पाच वर्षाचा आहे. आवश्यकतेनुसार त्यांची पुन्हा खरेदी केली जाईल असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page