रत्नागिरी /-

संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गवळवाडीतील ग्रामस्थ गोविंद धोंडू कांबळे यांच्या घरात घुसून बिबट्याने २३ डिसेंबर २०१७ ला भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर कांबळे यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळेल असे वनविभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता या घटनेला ३ वर्षे लोटली तरि एकही रुपयांची मदत कांबळे यांना मिळाली नसल्याची खंत त्यांनी संगमेश्वर न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

या हल्ल्यात कांबळे यांच्या डोक्यात बिबट्याने नखे घुसवून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यांच्या डोक्याला ५५ -६० टाके घालावे लागले. २४ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत त्यांच्यावर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी रत्नागिरी पोलिस आणि वनविभागाने रितसर पंचनामा करून नुकसान भरपाईचे आश्वासन दिले होते.

७ जानेवारी २०१८ ला त्यांच्यावरील काही टाके रत्नागिरीत काढण्यात आले तर २२ जानेवारीला राहिलेले टाके काढण्यासाठी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. या दरम्यान त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेच शिवाय मानसिक तापही सहन करावा लागला.यानंतर त्यांनी भरपाईसाठी वनविभागाकडे पाठपुरावा केला मात्र तालुक्याने जिल्ह्याकडे तर जिल्ह्याने तालुक्याकडे बोट दाखवले. यामुळे व्यथित झालेल्या कांबळे यांनी आता थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page