कणकवली /-

महामार्गावरून वेगाने वाहने चालवत अनेकदा वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत असून, गेल्या वर्षभरात महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राच्या पोलीस पथकामार्फत राबविण्यात आलेल्या मोहिमेत १ जानेवारी ते २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत २० हजार १२९ वाहनचालकांवर ६७ लाख ३० हजार ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतील ३ हजार ४२१ वाहनचालकांकडून ९लाख २३हजार ५००रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अनेकदा ई चलनाद्वारे ही कारवाई करण्यात येत असल्याने अजून १६ हजार ७०८ कारवाई झालेल्या वाहन चालकांकडून ५८ लाख ६हजार ८०० रुपयांच्या दंडाची रक्कम अद्याप वसूल व्हायची असल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव यांनी दिली. श्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग पोलिसांनी गणेशोत्सव काळातही अहोरात्र काम करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांकडून गेल्या वर्षभरात केलेल्या या कारवाईमध्ये इंटरसेप्टर एर्टीग कार मध्ये बसवलेल्या स्पीड तपासणी उपकरणाद्वारे करण्यात येणाऱ्या तपासणीत अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या २ हजार ८८६ वाहन चालकांवर २७लाख ७ हजार दंडाची कारवाई करण्यात आली.

महामार्गावरून वाहन चालवत असताना नियमांचे उल्लंघन करणे, दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सीट, तसेच चार चाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट न वापरणे, अवजड वाहन चालकांकडे आवश्यक ते कागदपत्र सोबत न बाळगणे अशा अनेक मुद्यांना अनुसरून ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसात महामार्ग पोलिसांनी या कारवाईत वाढ केली असून, महामार्गावर होणारे अपघात व त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी वाहनचालकांकडून नियमांचे पालन करण्याकरिता मोहीम हाती घेण्यात आल्याचे ही अरुण जाधव यांनी सांगितले.ओसरगाव टोल नाका येथे गेले दोन दिवस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवत असताना नियमांचे पालन करावे व कारवाई टाळावी असे आवाहन देखील श्री जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page