एल अँड टीच्या कंत्राटी कंपनीला भाजपा कार्यकर्त्यांनी दिला दणका!

कुडाळ /-

गेल्या काही महिन्यात मनमानी कारभार करत कुडाळमधील स्थानिक युवकांच्या न्याय्य मागण्यांना दाद न देणाऱ्या आऊटसोर्सिंग कंपनीच्या ऑफिसवर आज भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्व कामगारांसह धडक दिली. त्यामुळे गेले काही दिवस टोलवाटोलव करत कामगारांना वाटाण्याच्या अक्षता लावू पाहणाऱ्या एल अँड टीच्या आऊट सोर्सिंग कंपनीला चाप लागला असून, कामगारांना न्याय मिळाला आहे. भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांना कामगारांनी दिलेल्या निवेदनातील सर्व तक्रारी निकालात निघाल्या असून तसे लेखी पत्र कंपनीने कामगारांकडे दिले आहे.

माजी खासदार निलेश राणे यांच्या कुडाळ भेटीच्या वेळी कुडाळमधील कामगारांनी त्यांना आऊटसोर्सिंग कंपनीकडुन केल्या जाणाऱ्या अन्यायाबाबत तक्रारीचे निवेदन दिले होते.

मागची काही वर्षे तथा महिने हे सर्व कामगार लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कोकण रेल्वेच्या रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पामध्ये काम करत होते. मागील काही महिन्यांपासून त्यांचे वेतन वेळेत मिळत नव्हते. या कामगारांना ऐन चतुर्थीमध्येही पगार दिला गेला नव्हता. त्यांना अनुभव पत्र, सेवावेतन, २०२१ मधील वार्षिक बोनस देण्यास कंपनीने नकार दिला होता. कंत्राटामध्ये मान्य केल्यानुसार कामगारांचे वेतन महिन्याच्या पंधरा तारखेला देण्यास सुद्धा टाळाटाळ केली जात होती. एवढेच नव्हे तर आजपर्यंतची वेतन पावती त्यांना दिली जात नव्हती. परप्रांतीय अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना वेळोवेळी कामावरून कमी केल्याचे सांगत त्यांना वेतन देणे टाळत होते.

भाजपाच्या पाठपुराव्याने आज यासंबंधी चर्चा करण्यासाठी एल अँड टीचे अधिकारी श्री सुबैय्या, प्रविणकुमार कुडाळ येथे आले होते. आऊटसोर्सिंग कंपनीचे अधिकारीही उपस्थित राहिले होते. भाजपा कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर, मुन्ना दळवी यांनी कामगारांसह कंपनीच्या ऑफिसवर धडक देत या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. स्थानिक कामगारांवर अन्याय केल्यास विद्युतीकरणाचे काम चालू देणार नसल्याचा संतप्त इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. चर्चेअंती कामगारांच्या सर्व मागण्यांना न्याय मिळवून देण्यास भाजपा पदाधिकाऱ्यांना यश आले. कामगारांना नोटीस कालावधीचा पगार, बोनस, सर्व्हिस वेतन, अनुभव प्रमाणपत्र, वेतन पावत्या देण्याचे कंपनीने मान्य केले. कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि त्यांनी भाजपा पदाधिकारी व माजी खासदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page