सिंधुदुर्ग /-

इंस्टाग्रामवरून जुळलेल्या प्रेमसंबंधातून अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्या ऋषिकेश आनंदा जानकर याच्या मुसक्या वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांनी थेट अहमदनगर येथे जात अवघ्या 3 दिवसांत आवळल्या. अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन युवतीचे 15 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अपहरण झाल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिच्या नातेवाईकांनी दाखल केली होती. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी या गुन्ह्यात स्वतः लक्ष घालत घडलेल्या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती मिळवली. अल्पवयीन मुलीचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील ऋषिकेश आनंदा जानकर याने अपहरण केल्याची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक देसाई, पोलीस नाईक मारुती साखरे, कॉन्स्टेबल बिलपे यांचे पथक आरोपी जानकर याच्या मागावर पाठवले. पीएसआय देसाई यांच्या पथकाने वरवंडे ता.राहुरी जिल्हा अहमदनर येथे जात आरोपी ऋषिकेश जानकर याच्या मुसक्या 19 सप्टेंबर रोजी आवळल्या. तसेच अपहरण झालेल्या युवतीलाही ताब्यात घेत वैभववाडीत आणले . सदर युवती अल्पवयीन असल्यामुळे तिला बालकल्याण समिती समोर हजर केल्यानंतर कायदेशीर कारवाई करून पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी ऋषिकेश व अपहरण झालेल्या युवतीची इन्स्टाग्रामवर काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ऋषिकेश त्या अल्पवयीन युवतीला भेटण्यासाठी अहमदनगर वरून स्कुटी ने प्रवास करून गुन्हा घडलेल्या ठिकाणी आला. आणि 15 सप्टेंबर रोजी अल्पवयीन युवतीचे स्कुटीवरूनच अपहरण केले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 3 दिवसांत चतुराईने यशस्वी तपास करून अपहरण कर्त्याला गजाआड करतानाच अपहरण झालेल्या अल्पवयीन युवतीलाही वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बंगडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page