मालवण /-

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत, सनई व ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज मालवणात पाच दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यासह विविध विसर्जन स्थळी गणेशभक्तांनी भक्तीपूर्ण वातावरणात गणेश मूर्त्यांचे विसर्जन करून लाडक्या गणरायाला निरोप दिला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थी दिवशी मालवणात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. गेले पाच दिवस गणरायाची मनोभावे पूजा अर्चा व सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यानिमित्त मालवण समुद्र किनाऱ्यावर बंदर जेटी परिसरात आज सांयकाळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्तांची लगबग दिसून आली. गणरायाचा जयघोष करत, छोटेखानी सवाद्य मिरवणूक काढत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. बंदर जेटी बरोबरच चिवला बीच, दांडी किनारा, देऊळवाडा नाका आडारी ,कोळंब येथील नद्या ,नाले, ओहोळ ,विहिरी आदी व इतर विसर्जन स्थळी गणेश भक्तानी गणेश मूर्त्यांचे विसर्जन करत गणरायाला निरोप दिला. पाच दिवसांच्या गणेश मूर्त्यांच्या विसर्जनाच्या निमित्ताने मालवण पोलिसांनी बंदर जेटी परिसरासह ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. पोलीस कर्मचारी व होमगार्डस विसर्जनादरम्यान होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नजर ठेवून होते. बंदर जेटी परिसरात नगरपालिकेकडून लाईटची व्यवस्था तसेच निर्माल्य टाकण्यासाठी कचरा गाडी व कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तर गणेश मूर्ती विसर्जनासाठी हरी खोबरेकर मंडळातर्फे मोफत विसर्जन सेवा देण्यात येत होती. यासाठी दांडी ते मालवण बंदर जेटी किनाऱ्यापर्यंत हरी खोबरेकर मित्रमंडळाचे ३० सदस्य कार्यरत होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी मास्क वापरत व गर्दी होऊ नये याची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य केले. आचरा येथे गौरी गणपतीचे उत्साहात विसर्जन आचरा भागातील गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहात करण्यात आले. आचरा येथे समुद्र किनारी, पारवाडी खाडी चिंदर येथील विसर्जन ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना पाळत ग्रामस्थांनी गणपती विसर्जन केले. आचरा देवूळवाडी येथेही गौरीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने केले गेले. विसर्जन ठिकाणी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पिरावाडी समुद्र किनारी सागर रक्षक, जीवरक्षकांच्या मदतीने गणपती विसर्जन करण्यात येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page