अर्थपूर्ण हितसंबंधातून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या ग्रामविकास विभागातील “त्या” बड्या अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची नायालयाकडे मागणी करणार.;प्रसाद गावडे

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने दिलेल्या नियुक्त्या ह्या शासन नियम डावलून भ्रष्ट कारभार करीत चुकीच्या पद्धतीने दिल्याने मनसेने या संदर्भात कोंकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी होऊन आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना कारवाईचे आदेश दिले होते.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडील तत्कालीन पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. तर चुकीच्या पद्धतीने नियुक्ती मिळालेल्या “त्या” 6 उमेदवारांचे सेवा समाप्तीचे आदेश निर्गमित केले होते. या कारवाई दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे दालनात सुनावणी घेऊन “तात्पुरती स्थगिती” देण्याचे नियमबाह्य आदेश पारित केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई प्रक्रियेला “तात्पुरती स्थगिती”चे आदेश देऊन कारवाई प्रक्रिया थांबविली होती. भ्रष्टाचारी प्रवृत्तींना थेट मंत्र्यांनीच पाठीशी घातल्याने यामध्ये प्रशासकीय व्यवस्थेचे खच्चीकरण होऊन चुकीचा संदेश जनमानसात गेलेला होता.शिवाय शासन आदेशांची पायमल्ली होऊन देखील प्रशासकीय कारवाई दडपली जात असल्याने ल मनसेने यासंदर्भात अधिक आक्रमक भूमिका घेत चक्क उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत जनहित याचिका दाखल केल्याने याप्रकरणी आता अधिक कठोर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले असताना मनसेने थेट ग्रामविकास विभाग,कोंकण विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.सिंधुदुर्ग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रकरणाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याप्रकरणी ग्रामविकास विभागाचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिक हित संबंधांमधून नियमबाह्य पद्धतीने हस्तक्षेप करीत सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रकार केला आहे त्यामुळे “त्या” बड्या अधिकाऱ्यांचे मोबाईल संभाषण रेकॉर्ड तपासून भ्रष्टचाऱ विरोधी पथकाद्वारे सखोल चौकशी करावी, या प्रकरणाशी संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचेवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये फौजदारी कारवाई करावी अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचे माहिती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page