वेंगुर्ला /-


वेंगुर्ले पंचायत समितीच्या मासिक सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने आजच्या सभेत गरमागरम चर्चा झाली. तर कॅम्प येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन संदर्भात खास सभा घेऊन तारीख निश्चित करण्याचे आजच्या सभेत सर्वानुमते ठरले.वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा आज मंगळवारी बॅ. नाथ पै सभागृहात सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस उपसभापती सिद्धेश परब, गटविकास अधिकारी उमा पाटील, सदस्य सुनिल मोरजकर, यशवंत परब, मंगेश कामत, सदस्या स्मिता दामले, गौरवी मडवळ व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वेतोरे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे,याचा त्रास सर्वांनाच होत आहे. तालुक्यातील रस्ते अर्धवट स्थितीत व खड्डेमय आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबाबतचा आरोप स्मिता दामले यांनी उपस्थित केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सभेत उपस्थित नसल्याने अधिकारी उपस्थित झाल्याशिवाय सभेत पुढचा विषय घ्यायचा नाही,अशी भूमिका स्मिता दामले यांनी घेतली.
दरम्यान नवीन पं. स.इमारतीच्या उदघाटन विषयावर आजच्या सभेत खडाजंगी चर्चा झाली. यावेळी मंगेश कामत यांनी नोव्हेंबर पूर्वी या इमारतीचे उदघाटन करण्यात यावे अशी सूचना मांडली. तर या विद्यमान पं. स.सदस्यांच्या ५ वर्षाच्या कार्यकालात नवीन पं. स.इमारतीचे उदघाटन करायचे नाही का ? असा प्रश्न गौरवी मडवळ यांनी उपस्थित केला. यावेळी फर्निचर प्रस्ताव बाबत मागणी जिल्हा परिषद बांधकाम कडे गेलेली आहे. जि.प.कडून यासाठीचा ६५ लाखाचा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाकडे गेलेला आहे. परंतु सध्या निधी उपलब्ध नाही,अशी माहिती गटविकास अधिकारी उमा पाटील यांनी दिली. दरम्यान फर्निचर प्रस्तावाबाबत यशवंत परब यांनी विस्तृत चर्चा झाल्यावर तात्काळ प्रशासनास कळवा व याबाबत खास सभा घेण्यात यावी,याबाबत सद्यस्थितीबाबत आमदार यांना कळविण्यात यावे,अशी सूचना यशवंत परब यांनी मांडली. त्यानंतर नूतन इमारतीचे उद्घाटना संदर्भात खास सभा घेऊन तारीख निश्चित करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
तौक्ते चक्रीवादळात पूर्ण तालुक्यात किती नुकसान झाले व किती नुकसानभरपाई मिळाली याची गेल्या महिन्यात मागणी करूनही सभापती,सचिव व संबंधित खात्याचे अधिकारी यांनी गांभीर्य लक्षात न घेतल्यामुळे १ महिना कालावधी असूनसुद्धा सभागृहासमोर अहवाल सादर केला नाही,असे सांगत सुनिल मोरजकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यात खाते क्र., अकाऊंट नंबर आदी माहिती चुकीची भरल्यामुळे शेतकऱ्याला वेळेवर पैसे मिळालेले नाहीत, असा आरोप सुनिल मोरजकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page