कुडाळ /-

“ज्ञान मिळवायचं असेल तर लीनता महत्त्वाची आहे. विद्या विनयेन शोभते.गुरु समोर नतमस्तक झाल्याशिवाय हवे ते ज्ञान प्राप्त करता येत नाही.बदलत्या काळाप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी बदलले पाहिजे..असे उद्गार उमेश गाळवणकर यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “जीवनात स्वयंशिस्त, चिकाटी,गुरुजनांवर श्रद्धा,व नवनवीन ज्ञानाची शिदोरी असेलतर आपल्या क्षेत्रात यशस्वी होता येते.” हे सांगत दीन -दुर्बल लोकांच्या वेदना समजून घ्या.वेद कळले नाही तरी चालतील;पण वेदना समजून घ्या.माणसाने माणसांशी माणसा सारखे वागावे”. अशी अपेक्षा व्यक्त करत गुरूंना वंदन करून गुरूंना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर युवा परिवर्तन चे सीनियर डायरेक्टर अजित परब, युवा परिवर्तन चे हेड आॅफ ऑपरेशन सुरेश उत्तेकर, बॅरिस्टर नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी उपप्राचार्य कल्पना भंडारी बॅ.नाथ पै फिजिओथेरेपी कॉलजचे प्राचार्य डॉक्टर सुरज शुक्ला, महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे ,ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या मधुरा इंसुलकर तसेच प्रा. वैशाली ओटवणेकर, मानव संसाधन अधिकारी पियुषा प्रभूतेंडोलकर, उपस्थित होते . देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जवलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व शिक्षण संस्थेच्या सर्व अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांतर्फे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मनोगतामध्ये अजित परब यांनी”गुरू हे आपल्या अवतीभवती सगळीकडे अनेक रूपात भरून उरलेले असतात.त्याचा शोध घ्या.त्याच्या ठिकाणी नतमस्तक झाल्याशिवाय यश मिळत नाही आणि आपलेआयुष्य सुंदर होत नाही. त्यासाठी त्यांचा आदर ठेवा‌.असे सांगत गुरूंना वंदन केले . सुरेश उत्तेकर यांनी “गुरू या शब्दाचा उच्चारच माणसाला नतमस्तक व्हायला लावतो.यासाठी गुरुंचा आदर करा.त्यांकडून ज्ञान घेत स्वतःला परिपूर्ण बनवा”असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.प्राचार्या मीना जोशी यांनी विद्यार्थ्यांना “सतत शिकण्याची तयारी असली पाहिजे म्हणजे आपण ज्ञानी होतो.कोणती गोष्ट तुच्छ लेखू नये.त्यातूनही शिकता येते. तो ही आपला गुरू असतो”.असा संदेश दिला.प्रा.अरुण मर्गज यांनी ” अहंकार माणसाला प्रगती पासून दूर ठेवतो.तो टाकून द्या.’जो जो जयाचा घेतला गुण , तो तो म्या गुरू केला जाण.’ही वृत्ती ठेवा.ज्ञानसंचय वाढत जाईल.”असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या वतीने फिजियोथेरपी च्या प्राजक्ता सावंत, दिशा कांगदे, मृण्मयी खानोलकर, रेवती नाईक, शुभांगी लोहार ,मिताली शिवलकर यांनी मनोगत व्यक्त करत प्रार्थना व गीत,तर सीबीएसईच्या नेहा इंसुलकर, विवा परब, योगेश शर्मा, बीएससी नर्सिंग च्या प्रांजली सावंत, सलोनी महाजन,बी.एड महाविद्यालयाच्या रेश्मा बोरकर, प्रतिभा महाले, वैष्णवी चव्हाण यांनी मनोगतं व्यक्त केली.व सर्व गुरूना वंदन केले.व सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी केक कापून आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राजक्ता सावंत व दिशा कांगदे यांनी तर आभार डॉ. श्रेया देसाई यांनी मानले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन -नियोजन करण्यासाठी फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page