मुंबई /-

ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांना शुक्रवारी फोन केला होता. पिंपळे या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असताना त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांच्या धाडसाचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पिंपळे यांनी त्यांच्याकडे एक विनंती केली.

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कल्पिता पिंगळे यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून दिला. कल्पिता यांनी फोन घेताच मुख्यमंत्र्यांनी, “तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. मी तुम्हाला शब्द देतो की.तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार म्हणत आहात, पण आता ती जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही चिंता करु नका. लवकर बरे व्हा,” असं मुख्यमंत्री म्हणाले.यानंतर पिंपळे यांनी मुख्यमंत्र्यांना, “सर फक्त विनंती एवढीच आहे की जे या प्रकरणातील गुन्हेगार आहेत त्यांना शासन झालं पाहिजे,” असं सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेच, “अगदी अगदी. तुम्ही त्याची चिंता करु नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. दोषींना नक्की शिक्षा होणार आणि कठोर शिक्षा होणार. तुम्ही त्याची चिंता करुन नका तुम्ही लवकरात लवकर ठणठणीत बऱ्या व्हा,” असं मुख्यमंत्री म्हणाले.तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण या हल्ल्यानंतर भेट घेण्यासाठी का आलो नाही यासंदर्भातही कल्पिता यांना माहिती दिली. “मला रोज रिपोर्ट येत असतो. उगाच त्यात राजकारण नको म्हणून फोन करणं, भेटणं टाळलं. आरोपींना कडक शिक्षा होणार. त्याची काळजी तुम्ही करु नका,” असं मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांना सांगितलं.

नक्की काय घडलं?

गेल्याकाही दिवसांपासून ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी (३० ऑगस्ट २०२१ रोजी) कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले.

…अटक आणि गुन्हा..

घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पुन्हा कारवाई करणार

साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या एका बोटाची शस्त्रक्रिया मंगळवारी पहाटे ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहाय्यक आयुक्तांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली. आता बरं होताच पुन्हा एकदा अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करणार असं सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page