पोलिसांनी यासुरेश आत्मराम किर्वे ४८ या व्यक्तीला या प्रकरणी केली आहे अटक

रत्नागिरी /-

देवरुखजवळ असलेल्या हरपुडे येथे एका व्यक्तीच्या घरात तब्बव १८ जिवंत गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका ४८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सुरेश आत्मराम किर्वे असे या व्यक्तीचे नाव असून काल बुधवारी रात्री उशिरा हे गावठी बॉम्ब सापडले असून या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे.

हरपुडे येथील सुरेश किर्वे या व्यक्तीच्या घरात गावठी बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दहशतवादविरोधी पथक आणि बॉम्ब शोधक व निकामी पथक रवाना झाले. ही कारवाई यशस्वी होण्यासाठी या पथकांनी सापळा लावला. त्यानंतर पथकांबरोबर इतर पोलिसांच्या संयुक्त कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पाळत ठेवल्यानंतर संधी मिळताच सुरेश किर्वे याच्या घरावर छापा टाकला. या वेळी किर्वे याच्या घरात असलेला स्फोटकांचा साठा बघून पोलिसही चक्रावून गेले.

पोलिसांना या कारवाईत एकूण १८ गावठी बॉम्ब सापडले. विशेष म्हणजे हे बॉम्ब जिवंत होते. या गावठी बॉम्बची किंमत दीड लाखाहून अधिक आहे. या कारवाईत पोलिसांनी सुरेश किर्वे याला ताब्यात घेतले. जिवंत गावठी बॉम्ब बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवणे, त्याद्वारे मानवी जीवितास तसेच प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण करणे असे गुन्हे पोलिसांनी देवरुख पोलिस ठाण्यात दाखल केले.

गणेशोत्सवाच्या तोंडावर बॉम्ब सापडल्याने खळबळ

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला असून यादरम्यान रत्नागितीत गावठी बॉम्ब सापडल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. हरपुडे येथील रहिवासी सुरेश किर्वे यांनी हे गावठी बॉम्ब कशासाठी घरात ठेवले याचा तपास पोलिस करत आहेत. गणेशोत्सवात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता जिल्हा पोलिस सतर्क झाले आहेत. अशा प्रकारची स्फोटके आणखी कुठे आहेत का याचा शोध आता पोलिस घेत असून अनेक संशयित ठिकाणी पोलिसांनी छापा मारण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देवरुखचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page