खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या मागणीला यश..

खारेपाटण /-

गेले १० वर्षांहून अधिक काळ बंद असणारी खारेपाटण एस. टी. बसस्थानकातून मुंबईला जाणारी खारेपाटण ही गाडी आता पुन्हा एकदा नव्याने दि. १५ सप्टेंबर, २०२१ पासून खारेपाटण – बोरिवली अशी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी एस. टी. विभागीय अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर दिली.

खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे आज महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभागीय वाहतूक अधिकारी – मोहनदास कराडे, कणकवली आगार प्रमुख – प्रमोद यादव, वाहतूक निरीक्षक विभागीय कार्यालय कणकवली प्रमुख विशाल देसाई यांनी भेट दिली. तसेच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याशी खारेपाटण – बोरिवली गाडी सुरू करण्याबाबत चर्चा केली. दरम्यान खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रमाकांत राऊत यांनी दि. २४ फेब्रुवारी, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना खारेपाटण – बोरिवली सीटर व स्लीपर गाडी सुरू करण्याबाबतचे लेखी पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेत महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ मध्यवर्ती कार्यलय मुंबई यांनी तातडीने कार्यवाही करत दि.२ जुलै, २०२१ रोजी सिंधुदुर्ग विभाग एस. टी. विभागीय कार्यालयाला लेखी पत्र देऊन खारेपाटण – बोरिवली गाडी सुरु करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही केली.

खारेपाटण – मुंबई सेंट्रल या एस. टी. गाडीचा १० वर्षापूर्वी अपघात झाल्यानंतर खारेपाटण एस. टी. गाडी कायमस्वरूपी बंद करण्यात आली होती. यामुळे खारेपाटण बसस्थानकावर अवलंबून असलेल्या व मुंबईला जाणाऱ्या प्रवासी तसेच आजूवाजुच्या सुमारे ३० गावांना याचा फटका बसला व परिणामी येथील प्रवासी वर्ग हा कोकण रेल्वे व खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळला. आज नव्याने खारेपाटण एस. टी. गाडी सुरू करण्यात येणार असल्याने दशक्रोशीतील नागरिकांना तसेच मुंबई उपनगरात राहणाऱ्या कोकणी चाकरमानी वर्गाला याचा फायदा होणार असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी दिली.

खारेपाटण – बोरिवली ही गाडी खारेपाटण बसस्थानक येथून दि.१५ सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुटेल व दि. १९ सप्टेंबर, २०२१ पर्यंत सलग सुरू राहील व पुढे प्रवासी भारनियमन बघून कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येईल, अशी माहीती एस. टी. अधिकरी मोहनदास कराडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page