मुंबई /-

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतरपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. शिवसेनेकडून नारायण राणेंवर सातत्याने टीका होत असताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अप्रत्यक्ष रित्या नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी नारायण राणेंचे नाव न घेता टोला लगावत ते म्हणाले की, ‘राज्यात काही लोकांचे राजकीय पर्यटन सध्या सुरू आहे. हे असताना जुने व्हायरस देखील परत आले आहेत. या व्हायरसचा बंदोबस्त करावा लागेल, असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. लोकसत्ताच्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले आहे.

व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे:-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना संकटाविषयी बोलताना म्हणाले की, आपल्याला अजून थोडे दिवस थांबावे लागेल. कोरोनाचे संकट खरंच गेले आहे का? ते अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. थोडसं आहे. काही काही तर जुने व्हायरस देखील परत आले आहेत. मात्र ते व्हायरस सुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट्स त्याच्यात आणत आहेत. त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. या जुन्या आणि नव्या व्हायरसचा बंदोबस्त करु असा इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. तसेच काहीजण म्हणतील हे खुले केले ते का केले नाही. काही दिवस थांबा. टप्प्याटप्प्याने आपल्याला सर्व काही खुले करायचे आहे. एक दिवस हळूवारपणाने मास्कही काढणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचे संकट अजून गेले नाही:-

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, पर्यटन हे असे क्षेत्र आहे, सर्वांना फिरण्यासाठी आवडते. काही जणांचे राजकीय पर्यटन आहे. इथून तिथे, तिथून इथे काहीजण प्रवास करत असतात. ते वेगवेगळी ठिकाणे पाहत फरत असतात. मध्यंतरी केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. यामध्ये त्यांनी रिव्हेंज टुरिझम हा शब्द वापरला होता. म्हणजे टुरिझम रिव्हेंज. त्यांचे म्हणणे होते, जरा सावधता बाळगा. सर्व राज्यांना हे सांगण्यात आले. कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होते की पुन्हा हे संकट येऊ शकते असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page