सिंधुदुर्ग /-

 
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृती  स्थळाला भेट देत त्यांना अभिवादन करत, वीर सावरकर,बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करत केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या ‘ जन आशीर्वाद यात्रेला १९ ऑगस्ट पासून मुंबईतून धुमधडाक्यात सुरुवात झाली.’कोकणचे भाग्यविधाते ‘, ‘ जनसामान्यांचे नेतृत्व ‘, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज’ ‘,महाराष्ट्राचा झंझावात ‘ , ‘कोण आला रे कोण आला भाजपाचा वाघ आला’ अशा  घोषणा देत या यात्रेला सुरुवात झाली.

राणे  मूळचे शिवसैनिक.त्यांचे स्वागतही खास ‘ सेना स्टाईलने ‘ झाले.’रोड शो’, ‘शक्ती प्रदर्शन ‘ करण्यात, ‘इव्हेंट मॅनेजमेन्ट ‘ मध्ये तर राणे एकदम माहीर..! वातावरण निर्मिती करावी ती राणे यांनीच.’ये राणेका स्टाईल है..!’ असो..!

नारायण राणे यांच्या आतापर्यंतच्या राजकीय  प्रवासावर नजर टाकली तर  ‘सत्ता आणि संघर्ष ‘ असाच त्यांचा प्रवास राहिला आहे.  

१९६८ साली वयाच्या १६ व्या वर्षी राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.सुरुवातीला चेंबूरच्या शाखा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.’इन्कम -टॅक्स ‘ मध्ये नोकरी करता करता ते सेनेतही सक्रीय होते.१९८५ साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले.१९९० ते १९९५ मध्ये मालवण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रभावीपणे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हा भागावामाय केला.समाजवादी पक्ष, त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.

१९९१ साली छगन भुजबळ आपल्या काही समर्थक आमदारांसमवेत सेनेतून बाहेर पडले. सेनेला हा एक मोठा झटका होता.याचवेळी राणे यांचं सेनेत महत्व वाढलं आणि ते बाळासाहेबांच्या अगदी जवळ गेले.१९९० ते १९९५ अशी पाच वर्षे विधानसभा  विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली.याच काळात एक अभ्यासू,आक्रमक,लढवय्या विरोधी पक्ष नेता अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.१९९९ साली जेव्हा मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले तेव्हा सेना- भाजपा युतीचा मुख्यमंत्री कोण याचा अंदाज कोणालाच बांधता येईना.सहा महिन्यावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन बाळासाहेबांनी मुख्यमंत्रीपदाची माळ राणे यांच्या गळ्यात घातली.

मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी मुंबई ते सिंधुदुर्ग असा मुंबई -गोवा हायवेने जो ‘रोड-शो ‘ केला तो म्हणजे ऐतिहासिकच म्हणावा लागेल.

सन २००५ साली जेव्हा राणे यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाले तेव्हा पुढे कोणते पाऊल उचलायचे यावर सहकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ते मुंबईहून विमानाने थेट गोव्याला आले.गोवा ते कणकवली हा ‘रोड-शो ‘ असाच ऐतिहासिक होता.

खरं तर राणे यांची गेल्या १०-१२ वर्षांची राजकीय कारकीर्द सत्तेपेक्षा संघर्षाची अधिक होती.शिवसेना सोडल्यानंतर त्यांना कॉंग्रेसमध्ये  घेण्यात आलं ते शिवसेनेला रोखण्यासाठीच.मालवणच्या विधानसभा पोटनिवडणुकीत राणे विरुद्ध बाळासाहेब असा संघर्ष झाला आणि त्यात राणे विक्रमी मतांनी विजयी झाले.सेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले.राणेंचा हा विजय महाराष्ट्राच्या भावी राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरला

राणे आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री झाले.कोकणातून सेनेला हद्दपार करण्याची घोषणा त्यांनी केली.’सिंधुदुर्गात शिवसेना औषधालाही दिसणार नाही ‘अशी प्रतिज्ञा त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.ही प्रतिज्ञा त्यांनी खरी करून दाखवली.आज त्यांचे त्यावेळचे अनेक सोबती सेनेत आहेत.

राणेंना काँग्रेसने पक्षात घेतले होते ते मुख्यमंत्री करतो असा शब्द देऊन.मात्र बराच काळ गेला.राणे यांची काँग्रेस पक्षात घुसमट होऊ लागली.अखेर राणे यांनी काँग्रेस श्रेष्ठींवरच’ हल्ला बोल ‘करत उघड संघर्ष सुरू केला.त्यात त्यांचं पक्षातून निलंबन झालं. इकडे आघाडी सरकारमधील काँग्रेस-राष्ट्रवादी मध्ये कुरबुरी सुरू झाली.शरद पवार यांचं वर्चस्व वाढू लागलं.हस्तक्षेप वाढतोय असा आरोप होऊ लागला.शेवटी पवारांना रोखण्यासाठी राणेंचे निलंबन रद्ध करुन त्यांना पुन्हा मंत्री करून उद्योग खाते देण्यात आले. राणे स्थिरस्थावर होतात न होतात तोच  मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी राणेंचा या ना त्या कारणावरून पक्षांतर्गत संघर्ष सुरूच होता.हल्ल्यानंतर मुंबई पूर्वपदावर येत असतांना एका प्रसंगावरून  देशमुख यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.

देशमुख यांच्यानंतर आता राणेंची वर्णी लागणार हे जवळजवळ निश्चित होतं. मात्र काँग्रेस पक्षात  काहीच  खरं नसतं. आणि घडलंही तसंच राणेंचा पत्ता कट करून अशोक चव्हाण यांची वर्णी लागली.देशमुख- चव्हाण यांनी एकत्र येत मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडेच राहील याची पूर्ण खबरदारी घेतली.           

श्रेष्ठींनी दिलेला हा दगाफटका राणेंना असह्य झाला.सतत संघर्ष करणारे राणे गप्प कसे बसतील..? इकडे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राणे यांना धक्का देत त्यांचे वर्चस्व असलेली जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली.अखेर आपली कोंडी होतेय असं दिसताच स्वाभिमान दुखावलेले राणे २१,सप्टेंबर,२०१७ रोजी कॉंग्रेसमुक्त झाले.कॉंग्रेसमुक्तीची ही घोषणा त्यांनी सिंधुदुर्गात येऊन आपल्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून केली.सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा जिथं

काँग्रेसची संपूर्ण सत्ता होती.साहजिकच सिंधुदुर्गात काँग्रेसचं अस्तित्व नामामात्रच राहिलं..सेनेप्रमाणेच कॉंग्रेसही जिल्ह्यात औषधाला उरली नाही.

त्यानंतर राणेंनी राज्याचा दौरा केला कॉंग्रेस विरोधात आघाडी उघडली.अवघ्या १० दिवसातच १ ऑक्टोबर,२०१७ रोजी त्यांनी जिल्ह्यात येऊन आपल्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ‘ या नव्या स्वतंत्र पक्ष स्थापनेची घोषणा केली.

खरं तर मधल्या दहा दिवसांमध्ये राणे आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश करणार हे जवळजवळ निश्चित होतं.मात्र भाजपामधील एका गटाचा त्यांना जोरदार विरोध होता.एकदा पक्षाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते. भाजपामधील राणे विरोधी गटाच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. ‘ राणेंना विरोध करता तर मग इतक्या वर्षात कोकणात तुम्ही पक्ष का वाढवला नाही असा थेट सवाल त्यांनी त्यावेळी केला असल्याचे सांगण्यात आले.मात्र त्यानंतर  सेनेकडून राणेंना होणारा कडाडून विरोध,पक्षांतर्गत विरोध लक्षात घेऊन शहा यांनी या विषयी सबुरीने निर्णय घेण्याचे ठरवलं. 

राणेंना पक्षात घेतलं तर राज्यात असलेल्या युती सरकारवर त्याचा थेट परिणाम होईल ही शक्यता लक्षात घेऊन राणेंनी नवा पक्ष काढायचा,या पक्षाला ‘एनडीए ‘ मध्ये घटक पक्ष म्हणून घ्यायचे असंही पक्षाध्यक्ष अमित शहा आणि राणे यांच्या बैठकीत ठरलं असं सांगण्यात आलं. हा विषय पुढे  रेंगाळतच पडला.

कोकणच्या राजकारणातील एक मातब्बर नेते ही राणेंची खरी ओळख .मात्र स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यापासून तीन वर्षांत त्यांच्या राजकारणाचे फासे उलटेच पडत गेले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील निलेश राणे यांच्या पराभवानंतर सेना पुन्हा एकदा उभारी घेऊ लागली.या पराभवानंतर  ‘कोकणचे भाग्यविधाते ‘असा त्यांचा सतत  जयघोष करणारे, गौरव करणारे त्यांचे काही खंदे कार्यकर्ते ,नेते त्यांना सोडून सेनेत डेरेदाखल झाले.काहींनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर काहींनी काँग्रेसची वाट धरली.राणे हेआता जिल्ह्यापुरते नेते राहिले आहेतअसं म्हणत सेना नेते त्यांची टवाळी करू लागले.

 मात्र २०१८ मध्ये ‘ एनडीए ‘ चा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना  अमित शहा यांनी राज्यसभेची खासदारकी दिली तेव्हा मात्र राणेंची राजकीय कारकीर्द पुन्हा रुळावर येत आहे असं स्पष्ट दिसू लागले.

भाजपाने राणेंना खासदारकी बहाल केल्यानंतर आता लवकरच  ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणे आणि त्यांच्या समर्थकांना भाजपात प्रवेश मिळणार हे स्पष्ट दिसू लागलं.नवी दिल्लीत,राज्यात तशा हालचाली सुरू झाल्याआणि तेव्हापासून सेना -भाजपा युतीमध्ये तणाव सुरू होऊन तो वाढत गेला.दोन्ही पक्ष स्वबळाची भाषा करू लागले.

या कालालावधीत राज्यात अन्यत्र सेना-भाजपामध्ये धुसफूस ,तणाव,संघर्ष सुरू झाला असला तरी सिंधुदुर्गात मात्र भाजपा-सेनेत मैत्रीपूर्ण,सौहार्दपूर्ण, आणि प्रेमाचे संबंध होते.राणेंना विरोध हा दोघांमधील समान दुवा होता.म्हणूनच  विधानसभा निवडणुकीत राज्यात इतरत्र युती होणार नसेल तरी सिंधुदुर्गात मात्र युतीची भाषा उभय पक्षाचे नेते करत होते.त्याचे एकमेव कारण म्हणजे देवगड विधानसभा मतदार संघात नितेश राणे  यांना  विरोध.शेवटी राज्यात युती करण्याचं ठरलं.

जागा वाटपात देवगड मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला.त्याच दरम्यान पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार  नितेश राणे यांचा भाजपात प्रवेश झाला.याच मतदार संघातून नितेश राणे यांची उमेद्वारीही जाहीर झाली मात्र उमेदवारी अर्ज दाखल करतांना  भाजपाच्या एका गटाने नितेश राणेंच्या उमेदवारीला खो घालत ,राणेंची साथ सोडून सेनेत दाखल झालेल्या एका नेत्याला सेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरायला लावला ही घटना सर्वश्रुत आहे.राज्यात माण आणि देवगड सोडून सर्वत्र युती झाली फक्त माण आणि देवगड या दोनच मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती झाल्या.किंबहुना त्या जाणीवपूर्वक होऊ दिल्या.खरं तर सेनेच्या या उमेदवाराला भाजपात प्रवेश देऊन त्याला उमेदवारी देण्याचा ‘ प्लॅन ‘होता असं भाजपच्या गोटात बोललं जातं होतं. संतप्त झालेल्या राणेंनी थेट दिल्लीतून सूत्र हलवत हा डाव हणून पाडला हे सर्वश्रुत आहे.ही खेळी,कारस्थान करणाऱ्या त्या पक्ष संघटकाला भाजपा श्रेष्ठींनी नंतर कोकणातून उचलून गोव्यात टाकलं आणि भाजपा मधील राणेविरोधी गट थंड पडला.

 त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितेश राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीत आले असता याच सभेत खासदार नारायण राणे आणि त्यांच्या  असंख्य सहकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.देवगड या भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघातून नितेश राणे विक्रमी मतांनी विजयी झाले.

या विजयानंतर राणेंचे पक्षातील स्थान अधिक बळकट झालं.राणेंच्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनाला जेव्हा अमित शहा आले आणि त्यांनी जेव्हा राणेंचं कौतुक केलं. त्याचवेळी राणेंचं पक्षातलं स्थान आणखी बळकट झालं.तेव्हापासून राणे भाजपाचे राज्यस्तरीय नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.

केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार अशा बातम्या येऊ लागल्या तेव्हा अनेक तर्क – वितर्क सुरू झाले.आजच्या राजकीय परिस्थितीत सेनेला शह द्यायचा असेल ,उद्याच्या मुंबईसह अन्य महानगर पालिकांच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर राणे यांच्यावरच जबाबदारी सोपवायची यावर अमित शहा ठाम होते.मुंबई आणि कोकणात सेनेला राणेंच रोखू शकतात हे गृहीत धरूनच राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला गेला.

राणेंना केंद्रात मंत्रिपद इतक्या सहजपणे मिळालेलं नाही.ते मिळू नये यासाठीही शिवसेनेसकट भाजपामधील अनेक जण देव पाण्यात बुडवून होते.भाजपाच्या एका गटाने तर सोशल मीडियावरून ‘ मोदींचे अर्थविषयक सल्लागार असलेले सुरेश प्रभू यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार ‘अशा बातम्या फिरल्या.नव्हे त्या जाणीवपूर्वक फिरवल्या गेल्या.शपथविधीच्या दिवशी तर या बातम्यांना ऊत आला होता.राणे मंत्री होणार यापेक्षा ते कसे होणार नाहीत यावरच चर्चा रंगल्या.सायंकाळी ६ वाजता शपथविधी ठरला आणि राणेच होणार हेही निश्चित झालं.आमंत्रणं गेली तरीही काही जणांनी शपथविधी आधी  राणेंच्या अभिनंदनाच्या प्रतिक्रिया देण्याचं जाणीवपूर्वक टाळलं.’सहा नंतर फोन करा  ‘असंही काहींनी म्हटलं.मात्र जेव्हा राणेंनी पहिलीच शपथ घेतली तेव्हा मात्र इच्छुकांसकट अनेकांचे अवसान गळले असेल..?

सुरेश प्रभाकर प्रभुझांट्ये उर्फ सुरेश प्रभू  हे तसे अपघातानेच शिवसेनेत ओढले गेले.यामागील इतिहास मोठा आहे.एक मात्र नक्की,की लोकसभेची उमेदवारी प्रभुना बाळासाहेब ठाकरे यांनी दिली नाही तर ती मनोहर जीशी यांच्यामुळेच मिळाली.राजापूर मतदारसंघात मधू दंडवते,सुधीर सावंत यांच्या विरोधात सेनेचा उमेदवार कोण हा प्रश्न सेनेला भेडसावत होता.इच्छुक बरेच होते.कुठून तरी बॅ.शरद पालव यांचं नाव समोर आलं मात्र तेच फारसे इच्छुक नव्हते.जोशी सरांनी जेव्हा सारस्वत बँकेचे चेअरमन असलेल्या प्रभूंचे नाव पुढे केले तेव्हा त्यांच्या उमेदवारीवरून बराच काथ्याकूट झाला.प्रश्न  – उत्तरे झाली. अखेर प्रभू यांच्या नावाला बाळासाहेबांनी कशीबशी संमती दिली.प्रभूंच्या निवडून येण्याबद्दल बाळासाहेब साशंक होतेच म्हणूनच त्यांनी नारायण राणे यांच्यावर ‘ संपूर्ण ‘ जबाबदारी सोपवली.आदेश म्हटल्यानंतर राणे आणि त्यांच्या असंख्य समर्थकांनी,शिवसैनिकांनी अक्षरशः जीवाचं रान करून प्रभूना निवडून आणलं हे विशेष होय.प्रभूंच्या प्रत्येक निवडणूक विजयाचे श्रेय हे राणे आणि त्यांच्या समर्थकानाच द्यावइलागेल.

ऊर्जामंत्री असतांना बाळासाहेब ठाकरे आणि प्रभू यांच्यातील वादाचा प्रसंग ,प्रभू स्वतःहून मंत्रीपदावरून पायउतार झाले की त्यांचा राजीनामा घेतला गेला , सेनेत असूनही प्रभू हे भाजपाला कसे जवळचे वाटत होते,उद्धव ठाकरे आणि प्रभू यांच्यात काय बिनसले..? सेना सोडून प्रभू  भाजपात कसे आणि कशासाठी गेले हा इतिहास सेनेतील काही निवडक नेत्यानाच माहिती आहे.

सेना सोडणारे राणे हे सेनेच्या दृष्टीनं गद्दार ठरत असतील तर मग प्रभू कोण..? असा सवाल आजही राणे यांना मानणारे सेना- भाजपातील सामान्य कार्यकर्ते करतात.

 ‘ प्रभूंचं मंत्रिपद हुकलं त्यामुळे देशाचे, मोदींचे आणि भाजपाचे कसे नुकसान होणार आहे ‘, ‘प्रभु हे मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळातील पंचरत्नांपैकी एक रत्न,’ ‘कोळशांच्या गर्दीत हरवलेला हिरा ‘असं त्यांचं गुणगान गाणारा एक लेख फेसबुक वर सद्या व्हायरल झाला आहे.अशा या पोस्टमुळं त्यांचेच नुकसान अधिक होणार आहे हे त्यांच्या समर्थकांना आणि चाहत्यांना कळत कसं नाही..?

राणे यांची ‘जन आशीर्वाद यात्रा २५ व २६ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात येत आहे.यात्रेचा समारोप २६ ऑगस्ट रोजी सावंतवाडीत होणार आहे.राणेंच्या या यात्रेचं कशा पध्दतीनं स्वागत होतं,शक्ती प्रदर्शन किती होतं याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे.राणे केंद्रात मंत्री झाले त्या दिवसापासून रत्नागिरी-सिंधुदुर्गातील शिवसेना नेते व कार्यकर्ते ‘ सावध ‘झाले आहेत.नेते,कार्यकर्ते गट – तट विसरून कामाला लागले आहेत.
   
या यात्रेमुळ राजकीय समीकरणं लगेचच बदलतील असं म्हणता येणार नाही. या यात्रेला जिल्ह्यात कसा आणि कितपत प्रतिसाद मिळतो,केंद्रीय मंत्री या नात्यानं ते भविष्यात कशा पद्धती विकासात्मक कामं करतात.शिवसेना नेते ?कार्यकर्ते कशा पद्धतीनं त्याला सामोरं जातात यावरच पुढील राजकीय समीकरणं आणि गणितं अवलंबून आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page