कणकवली /-

कणकवलीतील प्रतिष्ठित वकिलांची व नगरसेविकेची गाडी कोणी जाळली?, संजू परबांची गाडी कोणी जाळली?, कुडाळमध्ये होंडाचा शोरुम कुणी जाळला?, गोव्याचा टोलनाका कुणी फोडला?, चिंटु शेखवर गोळीबार कुणी केला?, मत्स्य अधिकाऱ्यावर बांगडा कुणी फेकला?, शेडेकरांवर चिखल कुणी ओतला?, हे कोकणातील जनतेला माहिती आहे. दाऊद इब्राहिम हा जगात आपल्या काळ्या धंद्यांसाठी आणि दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे. तर नितेश राणे हे सुद्धा अशाच घाणेरड्या क्रुत्यांसाठी राज्यभर बदनाम आहेत. त्यामुळेच नितेश राणे म्हणजे कोकणच्या राजकारणातील दाऊद इब्राहिमच आहेत असा आरोप शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज केला.

कणकवलीत विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, गटनेते सुशात नाईक, ऍड हर्षद गावडे, रिमेश चव्हाण विलास गुडेकर आदी उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, आमदार नितेश राणेंचे वडील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील पर्सनेट मच्छीमारांकडून हफ्ते गोळा करायचे. त्यांनी जिल्ह्यात पर्सनेट धारकांची संस्था स्थापन केली होती. त्यामुळे किरण सामंत यांना सचिन वाझे संबोधणारे नितेश राणे आपल्या वडीलांना कुणाची उपमा देणार आहेत…? पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना ठामपणे उभी राहिली. दोन्ही मच्छीमारांमधील वादात जेव्हा पारंपरिक मच्छीमारांची डोकी फुटत होती, तेव्हा मस्तवाल पर्सनेट धारकांची तळी उचलणारे तत्कालीन पालकमंत्री नारायण राणेच होते.

ते म्हणाले, पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्नांवर आमदार वैभव नाईकांनी विधिमंडळात अनेक लक्षवेधी सूचना मांडल्या, अनेक तारांकित प्रश्न उपस्थित केले, अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळाला. मत्स्य अधिकाऱ्यावर बांगडा फेकून मारण्याची स्टंटबाजी करून पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावुन रस्त्यावरची लढाई लढावी लागते. २०१४ सालच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुसंख्य असलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी राणे कुटुंबियांना जन्माची अद्दल घडवल्यामुळे त्यावेळी पर्सनेटधारकांची भलावण करणारे राणे कुटुंबिय आता पारंपरिक मच्छीमारांना समर्थन देण्याची नाटकं करीत आहेत. त्यांचे पारंपरिक मच्छीमारांवरील प्रेम हे पूतना मावशीचे प्रेम आहे, याची एव्हाना गोरगरीब मच्छीमारांनाही जाणीव झालेली आहे.

ते पुढे म्हणाले, खंडणी वसुल करणे हा राणे कुटुंबियांचा पिढीजात व्यवसाय आहे. मंत्री असताना नारायण राणे मुंबईतील व्यावसायिकांकडुन खंडण्याच वसुल करायचे आणि नितेश राणे त्यांचीच परंपरा पुढे चालवत आहेत. चार वर्षापुर्वी जुहू येथील हॉटेल व्यावसायिक हितेश केसवानी यांनी नितेश राणेंविरोधात खंडणीची तक्रार मुंबई पोलिसांकडे दिली होती. त्यांनी नितेश राणेंच्या कॉल रेकॉर्डिंगचे पुरावे तक्रारीसोबत जोडले होते. एस्टेला हॉटेल सुरू ठेवण्यासाठी नितेश राणेंनी मालक हितेश केसवानी यांच्याकडे प्रति महिना दहा लाख रुपये खंडणी मागितली होती. त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये तोडफोड केली. कोकणातील कोणताही नेता दोन बोलेरो गाड्या भरून काळ्या गणवेशातील बॉडीगार्ड सोबत बाळगत नाही.

नितेश राणेंचा खंडणी वसुल करण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना सोबत दोन बोलेरो गाड्या भरून काळ्या गणवेशातील बॉडीगार्ड बाळगावे लागतात.

किरण सामंत हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे रोड कॉन्ट्रेक्टर आहेत. त्यांचे वडील आर डी सामंत हे सुद्धा रोड कॉन्ट्रेक्टर आहेत. त्यामुळे सामंत कुटुंबीयांनी कुणाच्या गाड्या-शोरुम जाळले नाहीत, हॉटेल फोडली नाहीत, टोलनाके फोडले नाहीत किंवा खंडणीही वसुल केली नाही. कोकणच्या राजकारणात हप्तेबाजी कोण करते है इकडच्या सुज्ञ जनतेला ठाऊक आहे असा आरोप श्री पारकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page