मालवण /-

पर्यटन व्यवसाय हा केवळ हॉटेल व्यवसायापूरता मर्यादित नसून यात अनेक घटक यात समाविष्ट असल्याने पर्यटनाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात पर्यटन व्यवसायाशी निगडित घटकांच्या विविध आघाड्या स्थापन करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती
देत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष श्री अविनाश सामंत यांनी कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय डबघाईला आला आहे त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे प्रयत्न राहतील असे श्री सामंत म्हणाले

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मालवण धुरीवाडा येथील हॉटेल सायबा येथे पार पडली. या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष डी. के. सावंत, खजिनदार नकुल पार्सेकर, सतीश पाटणकर, जितेंद्र पंडित, मालवण अध्यक्ष अविनाश सामंत, मंगेश जावकर, मिलिंद झाड, जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शेखर गाड, दादा वेंगुर्लेकर, डॉमनिक ब्रिटो, मिलिंद परुळेकर, तुळशीदास कोयंडे, गणेश पाडगावकर, समिधा मांजरेकर, सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा सावंत, उदय गावकर, गुरुनाथ राणे, भालचंद्र राऊत, कन्हैया तांडेल आदी उपस्थित होते. या बैठकीची माहिती श्री सामंत यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पर्यटन व्यवसायात हॉटेल व्यावसायिकांबरोबरच वाहतूक व्यावसायिक, सहकार क्षेत्र, व्यापारी, ग्रामीण भागातील पर्यटन व्यावसायिक आदी अनेकांचा समावेश होतो. या सर्वांना एकत्र आणून पर्यटनाशी जोडण्याचा प्रयत्न विविध आघाड्या स्थापन करून करण्यात येणार आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या प्रत्येक तालुका निहाय व पर्यटन गाव निहाय आघाड्या स्थापन करण्यात येऊन त्यांच्या कार्यकारिणी देखील लवकरच नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगून श्री सामंत यांनी गेले दीड वर्ष कोरोना महामारी, लॉकडाऊन यामुळे सर्वच पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. येत्या काळात जिल्ह्यातील सर्व पर्यटन व्यवसायिकांची एकत्रित मोट बांधून पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मालवण तालुक्यातील विविध आघाड्या स्थापन करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण शहर आघाडी अध्यक्षपदी मंगेश जावकर, मालवण तालुका महिला पर्यटन व्यावसायिक आघाडीच्या अध्यक्षपदी मेघा सावंत, उपाध्यक्ष पदी सौ. अन्वेषा आचरेकर, मालवण शहर महिला अध्यक्षपदी समिधा मांजरेकर, मालवण सहकार आघाडी अध्यक्षपदी भालचंद्र राऊत, मालवण तालुका वाहतूक आघाडी अध्यक्षपदी उदय गावकर, शहर वाहतूक आघाडी अध्यक्षपदी गणेश पाडगावकर, पर्यटन महासंघ देवबाग अध्यक्षपदी कन्हैया तांडेल, वायरी अध्यक्षपदी दादा वेंगुर्लेकर, संघटना मिडिया आघाडी प्रमुख श्री प्रफुल्ल देसाई यांची नेमणूक करण्यात आली अशी माहिती अविनाश सामंत यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page